एकनाथ शिंदेनींच केले होते १५ वर्षांपूर्वी टोलमाफीसाठी आंदोलन!

0

 

———-

एकनाथ शिंदेनींच केले होते
१५ वर्षांपूर्वी टोलमाफीसाठी आंदोलन!

मुंबईच्या प्रवेशद्वारावर १९९७ पासून टोल सुरू झाला. साधारणत: १५-२० रुपये टोल दर असावा. पण तेवढ्यावरुन खटके उडायला लागले होते. मुंबईच्या प्रवेशद्वारावरील कोपरीतून मुलुंडमध्ये जायचे असले, तरी मोटारीला पैसे भरावे लागत असत. काही जण टोल वाचविण्यासाठी श्रीनगरमधून जात, तर काही जण सिंधुदुर्ग हॉटेलच्या गल्लीतून मुलुंड चेकनाक्यापुढे निघत. या टोलचा ठाणेकरांना मनस्ताप सहन करावा लागत होता.
१९९९ नंतरच्या प्रत्येक निवडणुकीत ठाणेकरांच्या टोलचा मुद्दा चर्चेला येत असे. पण तोडगा निघत नसे. ठाणेकरांना दर निवडणुकीत गुंडाळले जात होते. पण सोशिक व सहनशील ठाणेकर टोल भरून मुंबईत ये-जा करीत होते. राजकीय नेत्यांची ओळख असलेले मोटारमालक आयआरबी, एमईपीएलचा टोलमाफीचा पास मिळविण्यासाठी साकडे घालत असत. त्यातील काही जण यशस्वी होत. तर काही जण नित्यनेमाने देवाला नमस्कार केल्याप्रमाणे भाई, दादा, शेठ यांना टोलमाफीची आठवण देत होते.
राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने राज्यातील ५३ नाक्यांवर टोलमाफी केली. पण मुंबईचा टोल कायम राहिला होता. लाखो वाहनचालकांना हे टोलचे जोखड असह्य होत होते. टोल भरताना होणारी कोंडी ही नित्याचीच होती.
२००९ मध्ये ठाणे शहरात चार मतदारसंघ झाल्यावर ठाणे शहर, कोपरी-पाचपाखाडी आणि ओवळा-माजिवडा मतदारसंघात शिवसेनेचा विजय झाला. त्यावेळी विधानसभा निवडणुकीची शपथ घेण्यासाठी विद्यमान मुख्यमंत्री व तत्कालीन आमदार एकनाथ शिंदे, ठाणे शहरचे आमदार राजन विचारे, ओवळा-माजिवड्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुलुंड चेकनाक्यावर आंदोलन केले. या ठिकाणी घोषणा देत आंदोलनावेळी टोलविना वाहने सोडण्यात आली. टोलमाफी कराच, असा आग्रह धरीत तिन्ही आमदार विधान भवनाकडे रवाना झाले. अन्, परत टोलवसुली सुरू झाली होती. त्यावेळी हे लुटूपुटूचे आंदोलन की प्रसिद्धीचा फार्स यावर चर्चा रंगली होती.

आज १५ वर्षानंतर राजकीय पट बदललांय. बुद्धीबळाचे प्यादे वजीरांच्या ठिकाणी विराजमान झालेत. अन्, त्यावेळचे सिनियर आज ज्युनियर झाले आहेत. या प्याद्यांमध्ये फाटाफूट झाली असून, कलहाचा सारीपाट रंगलाय.
ठाण्यातील चेकनाक्यावर आज दोन्ही शिवसेनेकडून विजयोत्सव होईल. एकनाथ शिंदे व प्रताप सरनाईक एका बाजूला, तर राजन विचारे दुसर्‍या बाजूला आश्वासपूर्तीबद्दल आनंद व्यक्त करतील.
ठाण्याच्या खाडीतून १५ वर्षात वाहून गेलेल्या पाण्याबरोबरच दोन्ही बाजूकडेच्या नेत्यांना एकत्र काम केल्याची आठवणही नकोशी होईल का?

– उंगल्या

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech