( नितीन सावंत)
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फटका त्यांना बसेलच परंतु मूळ शिवसेना ही आपलीच आहे हा त्यांचा दावा यामुळे ठरणार आहे. उद्धव ठाकरे यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांची खाजगी सुरक्षा घेऊन स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. एका बाजूला अदानी यांना विरोध करायचा आणि दुसऱ्या बाजूला अंबानी यांची खाजगी खाजगी सुरक्षा स्वतःच्या सेवेत दाखल करून घ्यायची हा दुटप्पीपणा भविष्यात त्यांना महाग पडणार आहे. उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख म्हणून वाय दर्जाची पोलिसांची सुरक्षा आहे. उद्धव ठाकरे राज्यातील प्रमुख नेत्यांपैकी व्यक्तिमत्व आहे. त्यांना सुरक्षा हवी पण उद्योगपतींची सुरक्षा कशासाठी हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली तेव्हा त्यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा नव्हती. त्यावेळी शिवसेनाप्रमुख शिवसैनिकांच्या कवचकुंडलात वावरत असत. शिवसैनिक हीच माझी कवच कुंडले आहेत असा ते नेहमी उल्लेख करत. परंतु शिवसेनाप्रमुखांचे वारसदार म्हणून मिरवणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी अंबानी यांची सुरक्षा घेऊन काय साधले? खरोखर एवढा धोका उद्धव ठाकरे यांना आहे का? आणि धोका असलाच तर उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक त्यांची सुरक्षा करण्यास सक्षम नाहीत का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
१९६६ साली कै. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी शिवसेनेची स्थापना केली. मुंबई मराठी माणसाची असताना मराठी माणसांवर इतर भाषिक अन्याय करीत ही गोष्ट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या विरोधात जोरदार आंदोलन केले. शिवसेनाप्रमुखांच्या या मुद्द्याला अपेक्षेपेक्षा मोठा पाठिंबा मिळाला. त्यावेळी शिवसेनेचे टीकाकार असे म्हणत की मुंबईतील कम्युनिस्टांचे वर्चस्व संपवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या छुप्या पाठिंब्याने शिवसेना स्थापनेला बळ मिळाले. त्यावेळी शिवसेनेत टीकाकार शिवसेनेला वसंत सेना असेही हिणवत असत. परंतु या सर्वांची पर्वा न करता कै. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची घोडदौड यशस्वीपणे सुरू ठेवली. त्यावेळी शिवसेनाप्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे यांना कोणतीही सुरक्षा नव्हती. शिवसैनिक हेच त्यांचे अंगरक्षक होते.
शिवसेनाप्रमुख एखादी भूमिका घेतल्यानंतर त्या भूमिकेवर ठाम राहत. कोणताही बदल त्या भूमिकेत होत नसे. मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यास शिवसेनाप्रमुखांनी विरोध केला होता. या मुद्द्यावरच मराठवाड्यात शिवसेनेचा पसारा वाढला. शिवसेना संघटनेचा पसारा वाढत असतानाच कै. बाळासाहेब ठाकरे यांना सरकारची कोणतीही सुरक्षा नव्हती. मात्र मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यास विरोध केल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे या मुद्द्यावर रान उठवण्यासाठी राज्यभर दौऱ्यावर निघाले होते. या दौऱ्याचा फटका आपल्याला बसेल ही कल्पना तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना आली. त्यांनी शक्कल लढवून शिवसेनाप्रमुखांची सुरक्षा वाढवली आणि पोलिसांनी सुद्धा त्यांना सांगितले की आपल्या भागावर अतिरेकी असून आपल्या जीवाला धोका आहे. त्यानंतर हा दौरा अर्धवट सोडून शिवसेनाप्रमुख मुंबईत परतले.
पुढे शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाची भूमिका घेतल्यानंतर अतिरेक्यांचा धोका वाढला त्यामुळे सरकारने त्यांच्या सुरक्षेत वाढ केली. त्याचबरोबर शिवसैनिक मातोश्री बाहेर पहारा देत तो वेगळा.
शिवसेनाप्रमुख आणि अनेक उद्योगपतींचे स्नेहाचे संबंध होते. कै. धीरूभाई अंबानी आणि कै.बाळासाहेब ठाकरे यांचे तर ऋणानुबंध होते. परंतु संघटनेच्या राजकारणात त्यांनी हे येऊ दिले नाही. तत्कालीन मंत्री गणेश नाईक यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगितल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात ठेवावे यासाठी दस्तूर खुद्द धीरूभाई अंबानी यांचा फोन आला होता. परंतु माझा आदेश हा आदेश असतो असे उत्तर त्यांनी धीरूभाईंना दिले. मात्र आताचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुकेश अंबानी यांच्या समूहाची सुरक्षा घेऊन मिरवत आहेत.
– नितीन सावंत
– ९८९२५१४१२४