मुंबई – टीम इंडियाने दि. २९ जून रोजी रात्री टी-२० विश्वचषक जिंकल्याने भारतीय क्रिकेटप्रेमी आनंदात न्हाऊन निघाले. पण या स्पर्धेच्या विजयानंतर टीम इंडियाच्या रोहित शर्मा आणि विराट कोहली या शिलेदारांनी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. भारताने तब्बल १७ वर्षांनंतर जेतेपद पटकावले. पण विराट, रोहितने टी-२० मधून निवृत्ती जाहीर केल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये अस्वस्थता पसरली. या दोन खेळाडूंच्या निर्णयाने क्रिकेटप्रेमींना धक्का बससेला असतानाच अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजानेही टी-२० मधून निवृत्तीची घोषणा केली.
विश्वविजेतेपद जिंकताच विराट कोहली याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याने याबाबत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केली. त्यानंतर चाहत्यांनी त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. नव्या दमाच्या क्रिकेटपटूंना संधी मिळावी, या उद्देशाने आपण ही निवृत्ती जाहीर करीत असल्याचा खुलासाही विराट कोहलीने केली. त्यावेळी विराटची निवृत्ती झाकोळून जाऊ नये, म्हणून कर्णधार रोहित शर्मा याने निवृत्ती जाहीर करणे टाळले. परंतु रात्री उशिरा रोहितनेही टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांतून निवृत्ती जाहीर केली.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने हिटमॅन, सिक्सरकिंग अशी ओळख निर्माण केलेली आहे. त्याने टी-२० क्रिकेटला अलविदा केला. त्यामुळे सर्वांचा लाडका रो-हिट आता भारताच्या टी-२० जर्सीत पुन्हा दिसणार नाही. त्यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींना धक्का बसला. त्याने कर्णधार म्हणून चांगली कामगिरी बजावत भारताला टी-२० विश्वचषक मिळवून दिला. त्यामुळे त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव सुरू असतानाच त्याने क्रिकेटप्रेमींना धक्का दिला.
या दोघांच्या निवृत्तीच्या धक्क्यातून क्रिकेटप्रेमी सावरतात न सावरतात तोच अष्टपैलू खेळाडू सर जडेजा यानेही टी-२० ला अलविदा केला. इन्स्टाग्राम खात्यावर एक पोस्ट लिहून त्याने आपला हा निर्णय जाहीर केला. सुसाट वेगाने अभिमानाने धावणा-या अश्वाप्रमाणे माझ्या देशासाठी मी माझे सर्वोत्तम देण्याचा नेहमी प्रयत्न केला. आता इतर फॉरमॅटमध्ये मी माझे सर्वोत्तम योगदान देण्याचा प्रयत्न करणार आहे. टी-२० वर्ल्डकप जिंकणे हे स्वप्न सत्यात उतरले आहे, असे तो म्हणाला.
तब्बल १७ वर्षांनंतर टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकून टीम इंडियाने इतिहास रचला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने हे सर्वोच्च यश मिळविले. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय संघावर अक्षरश: पैशांचा पाऊस पाडला आहे. आता भारतीय संघाला तब्बल १२५ कोटी रुपये बक्षीस मिळणार आहे. आधीच वर्ल्डकप जिंकल्याने टीम इंडिया मालामाल झाली.