नवी दिल्ली – भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाला मार्चमध्ये झालेल्या डोपिंग चाचणीत सहभागी न झाल्यामुळे निलंबित करण्यात आले. त्याने डोपिंग चाचणीला येण्यास नकार दिल्यानंतर राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने (नाडा) हा निर्णय घेतला. जुलै महिन्यात होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी पुनियाला हा मोठा झटका बसल्याचे बोलले जाते. ६५ किलो वजनी गटात पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणे बजरंगचे स्वप्न होते, ते आता भंग पावले आहे.
सोनीपत येथे झालेल्या चाचणीदरम्यान बजरंगने मुत्राचा नमुना देण्यास नकार दिला होता. त्यानंतर नाडाने त्याला नमुना देण्यास सांगितले होते. नाडाने याबाबत जागतिक उत्तेजक विरोधी संस्थेला (वाडा) माहिती दिली, त्यानंतर वाडाने नाडाला बजरंगला नोटीस पाठवून चाचणीला नकार का दिला याचे उत्तर मागितले. नाडाने २३ एप्रिल रोजी बजरंगला नोटीस बजावली आणि ७ मे पर्यंत उत्तर देण्यास सांगितले. “बजरंगबाबत अंतरिम निर्णय होत नाही तोपर्यंत तो कोणत्याही कुस्ती स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही,” असेही या पत्रात म्हटले होते. दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी झालेल्या राष्ट्रीय निवड चाचणीत बजरंगचा पराभव झाला होता.