मुंबई – तब्बल 17 वर्षांनंतर टीम इंडियाने दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कपवर (T20 World Cup 2024) नाव कोरत इतिहास रचला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने अंतिम सामन्यात चुरशीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. विशेष म्हणजे या संपूर्ण टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत टीम इंडियाने अपराजीत राहाण्याचा विक्रम केला. टी20 चॅम्पियन टीम इंडियाला आयसीसीकडून 20 कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात आली.
ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या टीम इंडियावर बीसीसीआयनेही (BCCI) पैशांची बरसात केली. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी विजेत्या टीम इंडियाला 125 कोटी रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली. आजपर्यंतची बक्षीस रुपातील ही सर्वात मोठी रक्कम ठरली आहे. पण आता क्रिकेट चाहत्यांना प्रश्न पडला आहे, तो इतक्या मोठ्या बक्षीसाचं वाटप होतं तरी कसं? 125 कोटी रुपयातील सर्वात मोठा वाटा कर्णधार म्हणून रोहित शर्माला मिळणार का? असे प्रश्न विचारले जात आहेत.
एका रिपोर्टनुसार 125 कोटी बक्षीसाच्या रकमेचं टीम इंडियाच्या सर्व 15 खेळाडूंमध्ये वाटप होईल. याशिवाय चार राखिव खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफलाही बक्षीसाच्या रकमेतील पैसे दिले जातात. प्रशिक्षक राहुल द्रविड या्ंच्यासह फलंदाज प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाज प्रशिक्षक पारस म्हांब्रे, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप, तीन थ्रोडाऊन तज्ज्ञ, प्रबंधक, लॉजिस्टिक मॅनेजर, व्हिडिओ विश्लेषक, सुरक्षा रक्षक आणि इंटीग्रीटी ऑफिसर यांचा सपोर्ट स्टाफमध्ये समावेश असतो.
बक्षीसाच्या 125 कोट रकमेतील प्रत्येक खेळाडूला कमीत कमी प्रत्येकी 5 कोटी रुपये मिळतील. राखीव खेळाडू आणि सपोर्ट स्टाप सदर्यांना कमीत कमी प्रत्येकी 1 कोटी रुपये देण्यात येतील. याशिवाय आयसीसीकडून मिळालेल्या 20 कोटी रुपयांच्या बक्षीसामधूनही खेळाडूंना रक्कम देण्यात येते.
भारतीय क्रिकेट बोर्ड हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. श्रीमंत क्रिकेट बोर्डाच्या यादीत दुसऱ्या क्रमांकवर असणाऱ्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डापेक्षा बीसीसीआयची कमाई 28 टक्क्यंनी जास्त आहे. बीसीसीआयकडून महसूल रुपात एक मोठी रक्कम आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाला दिली जाते.