बुमराह जैसा कोई नहीं…

0

दिनार पाठक

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतानं पाकिस्तानला हरवलं. खरं तर आतापर्यंत याची सवयच झाली आहे. कारण वर्ल्डकपमध्ये भारताला हरवणं पाकिस्तानला फक्त एकदाच शक्य झालंय. पण न्यू यॉर्कमध्ये झालेला रविवारच्या सामना भारत जिंकू शकला, याचं कारण होतं जसप्रित बुमराहची अप्रतिम गोलंदाजी…

रविवार ९ जून २०२४ची संध्याकाळ नेहमीपेक्षा वेगळी होती. कारण या संध्याकाळी दोनदा दिवाळी साजरी झाली. पहिली दिवाळी होती भाजपा समर्थकांची. कारण नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली, एनडीए सरकार सत्तेवर आलं. पण दुसरी दिवाळी सगळ्या भारतीयांनी साजरी केली. ती होती भारतानं वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला हरवल्यामुळे…

भारताचा हा विजय अनेक कारणांसाठी स्पेशल होता. कारण, पहिली फलंदाजी करायला उतरावं लागल्यावर भारताच्या मजबूत फलंदाजीचं काहीच चाललं नाही. भारतीय फलंदाज पूर्ण २० ओव्हर खेळूही शकले नाहीत, यातच काय ते आलं. एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. ‘तुम्ही कॅच सोडून दमता की, मी चेंडू हवेत मारून,’ अशा पद्धतीनं खेळलेल्या ऋषभ पंतने अनेक जीवदानं मिळून केलेल्या ४२ धावा सर्वोच्च होत्या. ऋषभचे अनेक कॅच पाकिस्तानने सोडले, तरी त्याने मात्र यष्टीरक्षण करताना तीन कॅच घेतले. पण प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानी गोलंदाजीसमोर भारताचं काहीच चाललं नाही. मैदानाच्या विचित्र आकारानेही भारताच्या अडचणी वाढवल्या. एका बाजूला सीमारेषा लांब आणि दुसऱ्या बाजूला जवळ अशा आकाराच्या या मैदानाचा पाकिस्तानी गोलंदाजांनी हुशारीनं फायदा उचलला.

पाकिस्तानी गोलंदाजीनं काम चोख बजावल्यानंतर फलंदाजांसाठी आव्हान तसं सोपं होतं. १२० चेंडूंत जिंकायला १२० धावा… टी-२०चा विचार केल्यास हे आव्हानच नव्हतं. पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवाननं सुरुवात तर धडाक्यात केली होती. पण… पिक्चर बाकी होता…

पहिल्या ९ ओव्हर्समध्ये फक्त १ विकेट देऊन ५० धावांपर्यंत मजल मारणाऱ्या पाकिस्तानच्या नंतर भारतीय गोलंदाजांनी मुसक्याच आवळल्या. विजयासाठी अवघ्या १२० करणंही मग पाकिस्तानला जमलं नाही.

याचं मुख्य कारण होतं जसप्रित बुमराह.

पाकिस्तानी फलंदाजांना बुमराहला कसं खेळायचं हे समजतच नव्हतं. चांगल्या सेट झालेल्या रिझवानला बुमराहनं क्लीन बोल्ड केलं, तिथूनच पाकिस्तानच्या तंबूत बहुतेक घबराट पसरली. हार्दीक पंड्यानंही या निर्णायक वेळी दोन विकेट काढल्या. पण बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानसह महत्त्वाच्या क्षणी इफ्तिकार अहमदलाही बाद करणारा बुमराहच खरा स्टार होता. टी-२० सामन्यात ४ षटकांत १४ धावा आणि ३ विकेट काढणारा बुमराहच दोन्ही संघांतला मुख्य फरक होता. कारण पाकिस्तानच्या नसीम शाह आणि हॅरिस रौफनंही या सामन्यात जबरदस्त गोलंदाजी केली. पण विकेट हातात असूनही पाकिस्तानला सामना जिंकू न देण्याची कमाल बुमराह आणि भारतीय गोलंदाजांनी केली, हे विशेष!

दे दणादण टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय गोलंदाजांनी १५व्या ओव्हरपासून कमालच केली. १५व्या षटकापासून सामन्यातील शेवटून दुसऱ्या चेंडूपर्यंत एकही चौकार-षटकार मारणं पाकिस्तानी फलंदाजांना शक्य झालं नाही.

अर्थात, भारतीय गोलंदाजीच्या आक्रमणाचा निर्विवाद सेनापती होता जसप्रित बुमराह…

हे ही वाचा : न्यू यॉर्कमध्येही भारताचाच विजयी डंका!

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech