मुंबई – आयसीसी वूमन्स टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेला आज 3 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात बांगलादेशने स्कॉटलँडवर विजय मिळवला. तर स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका हे 2 आशियाई संघ आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. फातिमा सनाकडे पाकिस्तानच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. तर चामारी अथापथु श्रीलंकेची कॅप्टन आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.त्याआधी 7 वाजता टॉस पार पडला. पाकिस्तानने टॉस जिंकून पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.
आतापर्यंत टी 20i क्रिकेट इतिहासात पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका हे दोन्ही संघ तुल्यबळ राहिले आहेत. आतापर्यंत उभयसंघात एकूण 20 टी 20i सामने खेळवण्यात आले आहेत. पाकिस्तानने या 20 पैकी 10 सामन्यात श्रीलंकेवर विजय मिळवला आहे.तर श्रीलंकेने 9 सामन्यात पाकिस्तानवर मात केली आहे. त्यामुळे आकडेवारी पाहता दोन्ही संघामध्ये चांगलीच चढाओढ पाहायला मिळणार हे निश्चित आहे. आता या 21 व्या सामन्यात पाकिस्तान श्रीलंकेसमोर विजयासाठी किती धावांचं आव्हान ठेवणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.