माद्रीद : टेनिस जगावर राज्य करणारा आणि २२ वेळा ग्रँडस्लॅम विजेता राफेल नदालने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. ३८ वर्षीय नदाल नोव्हेंबरमध्ये मलागा येथे होणाऱ्या डेव्हिस कप फायनलमध्ये शेवटचा सामना खेळणार आहे, त्यामध्ये तो स्पेनचे प्रतिनिधित्व करणार आहे. गुरुवारी व्हिडिओ संदेशाद्वारे त्याने ही घोषणा केली. नदाल म्हणाला, की जीवनात प्रत्येक गोष्टीला सुरुवात आणि शेवट असतो. मला वाटतं, ही माझ्या यशस्वी कारकिर्दीला निरोप देण्याची योग्य वेळ आहे.
नदालने पुढे स्पष्ट केले की, त्याचा शेवटचा सामना स्पेनसाठी खेळणे हे त्याच्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्याने म्हटले, की माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणारी ही शेवटची स्पर्धा डेव्हिस कप फायनल असेल याबद्दल मी खूप उत्सुक आहे. गेल्या काही वर्षांत नदालला दुखापतींचा सामना करावा लागला, विशेषतः मागील दोन वर्षे त्याच्यासाठी कठीण गेली. त्याच्या कारकिर्दीत तो टेनिसच्या विश्वात महत्त्वाचे योगदान देणारा एक दिग्गज खेळाडू ठरला. वयाच्या १४व्या वर्षी रॅकेट हातात घेऊन टेनिस प्रवासाला सुरुवात करणारा नदाल आठव्या वर्षीच टेनिस स्पर्धेत पदार्पण करून १२ वर्षांखालील गटात विजेतेपद मिळवणारा ठरला होता.
नदालने कारकिर्दीत तब्बल २२ ग्रँडस्लॅम जिंकण्याचा पराक्रम साधला. वयाच्या १२व्या वर्षापर्यंत तो टेनिस आणि फुटबॉल दोन्ही खेळत होता. पण त्याचे काका टोनी नदाल यांच्या मार्गदर्शनामुळे त्याने टेनिसची निवड केली आणि इतिहास रचला. ‘लाल मातीतला बादशाह’ म्हणून ओळखला जाणारा नदाल त्याच्या जिद्दी, कठोर मेहनत आणि अपार खेळाच्या आवडीसाठी प्रसिद्ध आहे. नदालच्या निवृत्तीमुळे टेनिस विश्वाला मोठा धक्का बसला असून त्याचे लाखो चाहते भावनिक झाले आहेत.