दुसरा वनडे सामना : भारताचा ४ गडी राखून इंग्लंडवर दणदणीत विजय

0

* मालिकेत २-० ने विजयी आघाडी * रोहितचं शतक, गिलचं अर्धशतक

कटक : तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा वनडे सामना आज खेळला गेला. हा सामना भारताने इंग्लंडवर ४ गडी राखून जिंकला. भारताने ४४.३ षटकांत ३०८ धावा करत सहा गडी गमावले. यासह या मालिकेत भारताने २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर रवींद्र जडेजाने ही गोलंदाजीत ३ गडी बाद करत महत्त्वाची भूमिका बजावली. यासह भारताने सलग सातव्यांदा मालिका विजय नोंदवला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा वनडे सामना आज, रविवारी कटकच्या बाराबाती स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघासमोर विजयासाठी ३०५ धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आणि सामन्यासह मालिका आपल्या नावावर केली.

रोहितने पहिल्या चेंडूपासून इंग्लंडच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला आणि ३० चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर ७६ चेंडूंमध्ये आपल्या वनडे कारकिर्दीतील शतकही पूर्ण केलं. रोहितने या डावात ९० चेंडूंचा सामना करत १२ चौकार आणि ७ षटकारांच्या साहाय्याने ११९ धावांची खेळी केली. तर त्याला शुभमन गिलची चांगली साथ मिळाली. गिलने ५२ चेंडूंचा सामना करत ९ चौकार आणि १ षटकारांच्या साहाय्याने ६० धावांची खेळी केली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी १३६ धावा जोडल्या. शुभमन गिल ६० धावांवर बाद झाल्यानंतर विराट कोहलीवर मोठी जबाबदारी होती. मात्र विराट अवघ्या ५ धावा करत तंबूत परतला. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि रोहित शर्माची जोडी जमली. दोघांनी मिळून अर्धशतकी भागीदारी केली आणि भारतीय संघाकडे विजयश्री खेचून आणण्यात मोलाची भर टाकली. श्रेयस ४४ धावांवर धाव बाद होऊन माघारी परतला. शेवटी अक्षर पटेलने भारतीय संघाचा डाव सांभाळला आणि भारताला विजय मिळवून दिला. आता मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बुधवारी, १२ फेब्रुवारी रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर दुपारी १.३० वाजता खेळवला जाईल.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech