मुंबई – ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी (७४) यांचे प्रदीर्घ आजारपणामुळे आज निधन झाले. क्रिकेटसह सिनेमा,संगीत, प्रवासवर्णने अशा विविध श्रेत्रांत त्यांची साहित्यिक मुशाफिरी सुरू राहिली. विनोदी शैलीत काढलेले चिमटे, उपमा अलंकार आणि वैशिष्ट्यपूर्ण, ओघवती शैली नेहमीच त्यांच्या लिखाणाची वैशिष्ट्ये राहिली.
मूळ सिव्हिल इंजिनियर असलेले संझगिरी लिखाणाच्या क्षेत्रात चांगलेच रमले. मुंबई महापालिकेत अभियंता म्हणून सेवा सुरू करणारे संझगिरी मुख्य अभियमंता-पाणीपुरवठा प्रकल्प म्हणून निवृत्त झाले. पण लिखाणाची आवड त्यांनी महापालिका सेवेत असतानाही जपली. त्यांचं क्रिकेटविषयक लिखाण हळूहळू चांगलंच लोकप्रिय झालं. क्रिकेट सामन्यांच्या निमित्ताने वेळोवेळी केलेल्या परदेश दौऱ्यांमध्येही त्यांनी अनेक विषय टिपले. त्यावरील लेखही चांगलेच वाचकप्रिय ठरले.
क्रिकेटवरील लिखाणामुळे त्यांची अनेक जगप्रसिद्ध क्रिकेटपटूंची भेट झाली. त्यातील अनेक खेळाडू त्यांचे खूप चांगले मित्रही झाले. संगीत, चित्पट, प्रवासवर्णने अशा विविधांगी लिखाणाची त्यांची ४० पुस्तके प्रसिद्ध झाली. महाराष्ट्रातील बहुसंख्य वृत्तपत्रांतून त्यांनी लिखाणही केले. सूत्रसंचालन, टीव्ही शोमध्ये सहभाग, क्रिकेटच्या किश्शांवरील कार्यक्रम अशी त्यांची चौफर मुशाफिरी सुरू राहिली आणि वाचक-प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरली. संझगिरी यांच्या निधनानंतर विविध मान्यवरांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत.
वन महाराष्ट्र आणि आपला ठाणेकरच्या वतीनेही द्वारकानाथ संझगिरी यांना आदरांजली!