(अनंत नलावडे )
मुंबई -वरळीतील हिट अँड रन प्रकरणात जीव गमवावा लागलेल्या कावेरी नाखवा यांच्या कुटूंबियांना विशेष बाब म्हणून १० लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केली. या प्रकरणात नाखवा कुटूंबाचे झालेले नुकसान कधीही भरून येणारे नसल्याने मानवतेच्या दृष्टीकोनातून ही मदत जाहीर केली असल्याचे त्यांनी सांगितले.मुंबई सागरी किनारा प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही मदत जाहीर केली.
वरळी येथे झालेल्या हिट अँड रन प्रकरणात आरोपी मिहीर शहा याला क्राईम ब्रँच पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला होता. त्यावर स्पष्टीकरण देताना या प्रकरणात कोण कितीही मोठा असला तरीही त्याला पाठीशी घातले जाणार नसल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी ठामपणे स्पष्ट केले.हे प्रकरण घडल्यानंतर पहिल्याच दिवशी आपण पोलिसांना आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यावर आपण ठाम आहोत असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.तसेच या घटनेनंतर आजच शिवसेनेचे पदाधिकारी राजेश शहा यांनाही थेट पक्षातून पदमुक्त केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई आणि इतर शहरात हिट अँड रन प्रकरणे वाढत असल्याने शहरातील बार,पब आणि मद्यविक्रीच्या दुकानांवर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले असून रात्री उशिरापर्यंत बार चालू ठेवल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येत आहे.तसेच अनधिकृतपणे चालणारे बार आणि पब जमीनदोस्त करण्याचेही निर्देश आपण संबंधित मनपा आयुक्तांना दिले असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
या प्रकरणांना आळा बसावा यासाठी ड्रिंक आणि ड्राइव्हची तपासणी आणि गस्त वाढवण्याचे निर्देशही ठाणे, पुणे, मुंबई पोलीस आयुक्तांना दिले असून ड्रिंक अँड ड्राइव्हच्या प्रकरणात कितीही मोठी व्यक्ती गुंतलेली असली तरीही तिला पाठीशी घातले जाणार नाही याचाही ठाम पुनरुच्चार मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना केला.
……………………..