वाशिंग्टन – मेक्सिकोमध्ये काल सकाळी ११ वाजता (भारतीय वेळेनुसार काल रात्री १० वाजता) अंधार झाला. यासह वर्षातील पहिले संपूर्ण सूर्यग्रहण झाले. मेक्सिकोसोबतच अमेरिका आणि कॅनडामध्येही त्याचा प्रभाव दिसला. ग्रहणाच्या मार्गात येणाऱ्या राज्यांमध्ये दिवसभरात सुमारे ४ मिनिटे २८ सेकंद अंधार होता. त्याचवेळी ५४ देशांमध्ये आंशिक सूर्यग्रहण झाले. अमेरिकेतील अर्कान्सासमध्ये सूर्यग्रहणाच्या वेळी ४०० जोडप्यांनी लग्न केले.
या लग्न सोहळ्यात प्रत्येकाने ग्रहण,चंद्र आणि तारे आयुष्यभर एकत्र पाहण्याची शपथ घेतली. यावेळी लग्नाच्या केकवर सूर्यग्रहणाचे छायाचित्रही काढण्यात आले होते. तर दुसरीकडे सूर्यापासून उत्सर्जित होणारी सौरऊर्जा आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम जाणून घेण्यासाठी अमेरिकन स्पेस एजन्सीने (नासा) ग्रहणकाळात साउंडिंग रॉकेट सोडले. साउंडिंग रॉकेट अंतराळात फार दूर जात नाहीत. ते पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ४८ ते १४५ किमी अंतरावरील अभ्यासासाठी वापरले जातात. दरम्यान, काल झालेल्या सूर्यग्रहणाचा कोणताही प्रभाव भारतात दिसला नाही, कारण ग्रहण सुरू झाले तेव्हा येथे रात्र झाली होती. नासाने सांगितले की, आता असे सूर्यग्रहण अमेरिकेत पुढील २१ वर्षे दिसणार नाही.