तेलंगणात १२ वीच्या निकालानंतर ३० तासांत ७ विद्यार्थ्यांची आत्महत्या

0

अमरावती- तेलंगणातील १२ वी बोर्डाचा निकाल जाहीर होताच गेल्या ३० तासांत ७ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्यात ६ मुलींचा समावेश असून मंचेरियल जिल्ह्यातील तंदूर येथे १६ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची पहिली घटना घडली. त्यानंतर राज्यभरातून आणखी आत्महत्येच्या घटना घडल्या. पोलिसांनी सांगितले की, हा विद्यार्थी ४ विषयांमध्ये नापास झाल्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.

या विद्यार्थ्याच्या व्यतिरिक्त राज्यातील इतर भागांतील १६ ते १७ वर्षांदरम्यान वय असलेल्या ६ विद्यार्थीनींनी आत्महत्या केली. काहींनी गळफास घेतला, काहींनी गावातील विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. हैदराबादच्या नजीक असलेल्या राजेंद्रनगर आणि खम्मम, महबुबाबाद आणि कोल्लूर या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली.

यावर्षी तेलंगणातून सर्वाधिक विद्यार्थ्यांनी जेईई मुख्य परीक्षेत यश मिळवले असताना बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या बोर्ड परीक्षेसाठी ९.८ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. मागच्यावर्षी पेक्षा यावर्षी २ आठवडे आधीच परीक्षेचा निकाल यंदा जाहीर करण्यात आला. पहिल्या वर्षाच्या म्हणजेच्या ११वीच्या परीक्षेत ६१ टक्के विद्यार्थी (२.८७ लाख) उत्तीर्ण झाले आहेत. तर दुसऱ्या वर्षाच्या म्हणजेच बारावीच्या परीक्षेत ६९.४६ टक्के (३.२२ लाख) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जे विद्यार्थी नापास झाले आहेत. त्यांना मे महिन्यात पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech