सांगली जिल्ह्यातील पलूस गावात घडला प्रकार
सांगली – सांगली जिल्ह्यातील पलूस येथे गर्भवती माता आणि बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात मृत साप आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाचे पडसाद विधिमंडळात देखील उमटले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. वाळा या सापाच्या जातीचे हे मृत पिल्लू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकारानंतर या पोषण आहार वाटपाला तातडीने स्थगित करण्यात आली आहे.
वास्तविक महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास योजने अंतर्गत गर्भवती माता आणि बालकांना पोषण आहाराचे वाटप करण्यात येते. डाळ, तांदूळ, तिखट, मीठ एकत्र असणारे पॅकेट यामध्ये वाटण्यात येते. दरम्यान पलूस येथील माजी सैनिक सुभाष निवृत्ती जाधव यांनी त्यांचा नातू शिरीष याच्यासाठी आलेला पोषण आहार घरी नेला होता. आहाराचे पॅकेट उघडल्यानंतर त्यामध्ये मृत वाळा जातीचा साप आढळून आला. जाधव यांनी या सर्व प्रकाराची माहिची अंगणवाडी सेविकांना दिली. त्या नंतर ही बातमी राज्यभर पसरली आहे.
पोषण आहाराच्या बाबतीत अशा पद्धतीची ही पहिलीच घटना नाही. या आधी देखील अनेकदा पोषण आहारात मेलेले किडे, झुरळ आदी निघालेले आहेत. प्रत्येक वेळी प्रशासनाच्या वतीने या संदर्भात कडक कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात येते. या वेळी देखील प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. इतकेच नाही या घटनेचे प्रडसाद आज विधिमंडळात देखील उमटले आहेत.
विश्वजीत कदम यांनी उपस्थित केला प्रश्न
गर्भवती माता व सहा महिने ते तीन वर्षीय बालकांना दिला जाणाऱ्या पोषण आहारात पलूस तालुक्यातील शाळेत मृत सापाचे पिल्लू सापडलेले आहे. हि गंभीर बाब आहे. शासनाने गर्भवती महिला व लहान बालकांच्या जीवाशी खेळ होतोय हे लक्षात घेतले पाहिजे. यातील दोषींवर कडक कारवाई करा, अशी मागणी काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी केली आहे.