लखनौ : सध्याचं जग हे तंत्रज्ञानाचं जग आहे. हातातील मोबाईलच्या मदतीने तुम्ही तुमचे बँकेचे सर्व व्यवहार करू शकता. मात्र कधीकदी याच आधुनिक तंत्रज्ञानामुळे मोठी अडचण निर्माण होते. याचा फटका कधीकधी बँकेला तर कधीकधी सामान्य ग्राहकांना बसतो.
असाच एक प्रकार उत्तर प्रदेशमधील भदोही जिल्ह्यात घडला आहे. बँकेच्या तांत्रिक बिघाडामुळे हा शेतकरी एका रात्रीत थेट अब्जाधीश झाला आहे. या घटनेची सध्या सगळीकडे एकच चर्चा होत आहे.
हा शेतकरी एका रात्रीत अब्जाधीस कसा झाला असे विचारले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमधील भदोही जिल्ह्यातील अर्जूनपुरू येथील रहिवासी असलेल्या एका युवा शेतकर्याच्या खात्यात थेट ९९ अब्ज रुपये ट्रान्सफर झाले आहेत. खात्यावर एवढी सारी रक्कम पाहून हा शेतकरी तसेच बँक मॅनेजरदेखील थक्क झाला आहे.
सध्या बँकेने या शेतकर्याचे खाते होल्ड केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार ज्या शेतकर्याच्या बँक खात्यात अब्जो रुपये ट्रान्सफर झाले, त्या शेतकर्याचे नाव भानुप्रकाश बिंद असे आहे. त्यांचे सुरियावां येथील बँक ऑफ बडोदा या बँकेत खाते आहे.
त्यांच्या या खात्यात १६ मे रोजी अचानक ९९९९९४९५९९९.९९ रुपये (९९ अब्ज ९९ कोटी ९४ लाख ९५ हजार ९९९ रुपये) दिसायला लागले. बँक खात्यात एवढे सारे पैसे पाहून बँकेचे अधिकारीदेखील चकित झाले. बँकेच्या अधिकार्यांनी ही माहिती लगेच खातेदार भानुप्रकाश बिंद यांना दिली. ही सूचना मिळताच बिंद यांनीदेखील बँकेत धाव घेतली. बँकेत एवढी सारी रक्कम पाहून तेदेखील चकित झाले.
येथील बँक ऑफ बडोदाचे प्रभारी अध्यक्ष आशीष तिवारी यांनी या प्रकाराबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. खातेधारक भानुप्रकाश यांचे बँकेत केसीस खाते आहे. या खात्यातून त्यांनी कर्ज घेतलेले आहे.
त्यांचे खाते आता एनपीए झाले आहे. त्यामुळेच त्यांच्या खात्यात चुकीची रक्कम दाखवली जात आहे. सॉफ्टवेअरमधील चुकीमुळे ऋण चिन्हा लागले नाही. त्यामुळेच हा घोळ झाला, असे तिवारी यांनी सांगितले. या घटनेनंतर योग्य ती कारवाई करण्यात आली आहे. सध्या भानूप्रताप यांचे बँक खाते होल्ड करण्यात आले आहे.