मुंबई – मुंबईतील मुसळधार पावसाने काहींना आपले प्राण गमवावे लागले. बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले होते, त्यामुळे रस्त्यांना नदीसारखे स्वरूप आले. या मुसळधार पावसात कामावरून घरी परतणाऱ्या एका महिलेचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला. अंधेरी येथील सिप्झ परिसरात, गेट क्रमांक-३ समोर, महिलेचा पाण्याचा अंदाज न आल्यामुळे मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला. या महिलेचे नाव विमल अप्पाशा गायकवाड होते. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. महिलेच्या बेपत्ता असल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाने शोध मोहीम हाती घेतली, आणि एक तासानंतर तिचा मृतदेह नाल्यातून शंभर ते दीडशे मीटर अंतरावर सापडला. या घटनेच्या वेळी मेट्रोचे काम सुरू असलेल्या परिसरात ड्रेनेजचे झाकण उघडे होते, आणि महिला त्यामध्ये पडून वाहून गेली होती. या दुर्घटनेने परिसरात खळबळ उडाली होती, आणि घटनास्थळी स्थानिक पोलिस आणि महानगरपालिकेचे कर्मचारी दाखल झाले होते. तसेच, कल्याण तालुक्यात विज पडून दोन कामगारांचा मृत्यू झाला. कांबा परिसरातील खदाणीत काम करत असताना राजन यादव आणि बंदनाराम मुंडा या दोन कामगारांचा विजेने मृत्यू झाला. या घटनेचा तपास टिटवाळा पोलिसांनी सुरू केला आहे. मुंबई आणि ठाण्यातील काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा दिला होता, ज्यामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. मागील २४ तासांत मुंबईतील काही भागात २५० मिमीहून अधिक पाऊस झाला.