मुंबई – आज 1 मे 2024 पासून सर्वच महिलांच्या आधारकार्ड, पॅनकार्ड आणि शासकीय कागदपत्रांमध्ये बदल करून त्यात आईच्या नावाचा समावेश करायचा आहे अशी माहिती आज सकाळपासून सोशल मीडियावर फिरू लागल्याने प्रचंड गोंधळ उडाला. त्यातच विवाहित स्त्रियांनीही आईचे नाव समाविष्ट करायचे का? हा प्रश्न निर्माण झाला आणि त्यामुळे या गोंधळात अधिकच भर पडली. महाराष्ट्र शासनाने 14 मार्च 2024 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार 1 मे 2024 या दिवसापासून पुढे जन्मलेल्या बाळांच्या जन्म आणि इतर शासकीय नोंदणीत आईच्या नावाचा समावेश करायचा आहे. यापूर्वी जन्मलेल्यांना हा नियम लागू नाही. तसेच विवाहित महिलांना हा नियम लागू नाही, असे शासन निर्णयात स्पष्ट म्हटले आहे.
महिलांना मानाचे स्थान मिळावे आणि त्यांचा सन्मान व्हावा या दृष्टीने शिंदे सरकारने 14 मार्च 2024 शासन निर्णय मंजूर केला. यानुसार 1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्यांना जन्मदाखला, शाळा प्रवेश, शैक्षणिक कागदपत्रे, जमिनीचा सातबारा, संपत्ती दस्तावेज, शासकीय / निमशासकीय कर्मचार्यांचे सेवा पुस्तक, वेतन चिठ्ठी, शिधावाटप पत्रिका, मृत्यूदाखला अशा सर्व शासकीय दस्ताऐवजांवर व्यक्तीच्या नावाच्या नंतर आईचे नाव, त्यानंतर वडिलांचे नाव व त्यानंतर आडनाव अशा प्रकारे नोंद करावयाची आहे. यासाठी शासकीय दस्ताऐवजांवर आणखी एक रकाना जोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. विवाहित स्त्रियांच्या बाबतीत आताच्या पद्धतीनुसार विवाहानंतरचे तिचे नाव, त्यानंतर पतीचे नाव, त्यानंतर आडनाव अशाच नेहमीच्या स्वरुपात नावनोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. अनाथ मुलांच्या बाबतीत सूट देण्यात आलेली आहे.
प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीमध्ये विद्यार्थ्याचे नाव दाखल करताना नोंद वहीमध्ये विद्यार्थ्याचे पूर्ण नाव लिहिल्यानंतर शेजारच्या रकान्यात विद्यार्थ्याच्या आईच्या नावाची नोंद करायची आहे. त्याचप्रमाणे शाळा सोडण्याचा दाखला देताना विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव लिहिल्यानंतर त्याखाली विद्यार्थ्याच्या आईचे नाव लिहिण्यात येईल.
जर घटस्फोट झाला असेल आणि अपत्त्याचा ताबा न्यायालयाने आईकडे दिला असेल तर अशा घटस्फोटित महिलेने आपल्या अपत्त्याच्या नावापुढे वडिलांचे नाव लावण्याऐवजी आईचे नाव लावावे, अशी विनंती केली तर काही अटीची पूर्तता झाल्यास आईचे नाव लावण्यात येईल. जन्म-मृत्यूच्या नोंदवहीत केंद्र शासनाशी विचारविनिमय करून केंद्र शासनाने याबाबत आदेश दिल्यानंतर बालकाचे नाव, आईचे नाव व नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा तर्हेने नोंद केली जाईल. हा शासननिर्णय लक्षात घेता 1 मे 2024 पूर्वी जन्मलेल्यांना कोणताही बदल करायचा नसून आधारकार्ड, पॅनकार्ड इत्यादी शासकीय दस्ताऐवजात कोणताही बदल करण्याची गरज नाही.