मुंबई – महाविकास आघाडीचे नुकतेच जागावाटप जाहीर करण्यात आले असून सांगलीतील जागा शिवसेना उबाठा पक्षाला देण्यात आली आहे. त्यामुळे, गेल्या अनेक दिवसांपासून मविआमध्ये सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.
आता महायुतीमधील उरलेल्या अंतिम जागांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात राजकीय धुरळा उडायला आता सुरुवात झाली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून महत्त्वाच्या मतदारसंघात बडे नेते स्वत:हून प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात पवार कुटुंबातील राजकीय लढत आहे. सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळेंच्या लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले असून अजित पवारांकडून बारामतीमध्ये दमदाटी करण्यात येत असल्याचा आरोप केला जात आहे.
बारामती मतदारसंघातही नागरिकांना धमकावण्याचे उद्योग सुरू आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी येथे केला. त्यानंतर, आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. बारामतीमध्ये अजित पवारांकडून धमकावण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. फोन करून दमदाटी केली जाते, बदली करून टाकतात. अरुण गवळी जसे निवडणुकीला करत होता तसे, अजित पवार बारामतीचे अरुण गवळी झाले आहेत, अशा शब्दांत आमदार आव्हाड यांनी अजित पवारांना लक्ष्य केले.
तसेच, बारामतीची ओळख ही शरद पवारांमुळे आहे. बिल क्लिंटन बारामतीत अजित पवारांमुळे आले नव्हते, नरेंद्र मोदी हेही अजित पवारांमुळे बारामतीत आले नव्हते, ते शरद पवारांमुळेच आले होते. त्यामुळे, बारामतीची जनता शरद पवारांच्या पाठिशी आहे, सुप्रिया सुळेंच्या सोबत आहे. म्हणून, बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे २ लाखांपेक्षा अधिक मताधिक्य घेऊन विजयी होणार, असे भाकितही आव्हाड यांनी केले आहे.