लखनऊ: देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातलं मतदान सुरु आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या अमेठी, रायबरेलीचा समावेश पाचव्या टप्प्यात आहे. गेल्या निवडणुकीत अमेठीचा बालेकिल्ला भेदणाऱ्या भाजपनं यंदा रायबरेली सर करण्यासाठी जोरदार ताकद लावली आहे. शनिवारी गृहमंत्री अमित शहांनी अमेठीत रोड शो केला. अमेठीमधून भाजपनं पुन्हा एकदा स्मृती इराणींना तिकीट दिलं आहे. शनिवारी शहांनी इराणी यांच्या प्रचारार्थ रोड शो केला. त्यावेळी त्यांनी जिल्हा पंचायत अध्यक्ष राजेश अग्रहरी (राजेश मसाला) यांना फटकारलं. राजेश मसाला हे इराणींचे निकटवर्तीय मानले जातात. शहांनी राजेश मसाला यांना हटकल्याचा प्रकार राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला.
पाचव्या टप्प्यातील मतदान आज होतंय. या टप्प्यातील प्रचारासाठी शनिवारचा दिवस अखेरचा होता. या दिवशी शहांनी स्मृती इराणींसाठी रोड शो केला. त्यावेळी ते उपस्थितांचं अभिवादन स्वीकारत होते. अमित शहांवर पुष्पवृष्टी सुरु होती. अमित शहांनी रायबरेलीचे काँग्रेसचे उमेदवार राहुल गांधींवर टीका करत होते. अमित शहा राहुल गांधींवर शरसंधान साधत असताना राजेश मसाला प्रचाररथावरील पहिल्या रांगेत येऊन उभे राहिले. शहांचं भाषण सुरु असताना ते मध्येच बोटांनी व्हिक्टरी साईन दाखवू लागले. त्यावेळी शहांनी भाषण थांबवलं. मसाला यांना फटकारलं. यानंतर शहांनी भाषण पुन्हा सुरु केलं.