माफी स्वीकारणार नाही, कारवाईला सामोरे जा

0

मुंबई : दिशाभूल जाहिरातीच्या प्रकरणावरून पतंजली आयुर्वेदाचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण आणि बाबा रामदेव यांना आज सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा फटकारले आहे. दिशाभूल जाहिरातीच्या प्रकरणात बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांचा दुसरा माफीनामा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला. या प्रकरणाची बुधवारी (१० एप्रिल) न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अमानतुल्ला यांच्या खंडपीठासमोर पतंजलीची बाजू वकील विपिन सांघी आणि मुकुल रोहतगी यांनी मांडली.

यावेळी न्यायलयाने म्हटले की, “तुम्ही न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले असून कारवाईला सामोरे जा.” याआधी २ एप्रिलला झालेल्या सुनावणीवेळी पतंजलीच्यावतीने माफीनामा सादर करण्यात आला होता. यावरुन न्यायालयाने पतंजलीला फटकारले होते. तसेच सुनावणीची पुढील तारीख दिली होती. यानुसार आज सुनावणी पार पडली. मात्र, या सुनावणीच्या आधीच एक दिवस म्हणजे ९ एप्रिलला पतंजली आयुर्वेदाचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण आणि बाबा रामदेव यांनी पुन्हा प्रतिज्ञापत्र सादर करत दुसऱ्यांदा माफी मागितली होती. मात्र, हा माफीनामा न्यायालयाने फेटाळला आहे.

दरम्यान, पतंजलीच्या दिशाभूल जाहिरातीच्या प्रकरणासंदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर १७ ऑगस्ट २०२२ पासून सुनावणी सुरु आहे. यामध्ये पतंजलीच्या आयुर्वेदिक औषधांनी काही आजार बरे होत असल्याचा खोटा दावा केल्याचा आरोप यामध्ये करण्यात आला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech