अयोध्या – बाबरी मशीद खटल्यात पहिल्यापासून मंदिर उभारणीच्या विरोधात असलेले पक्षकार इक्बाल अन्सारी यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला करण्यात आला. हा खटला सुरू असताना 2019 साली मंदिराला विरोध करतात म्हणून एक महिला व पुरुषाने त्यांच्या घरात घुसून त्यांच्यावर हल्ला केला होता. काल त्यांच्यावर पुन्हा हल्ला झाला. पण यावेळी ते पंतप्रधान मोदींचे कौतुक करतात म्हणून त्यांच्यावर हल्ला झाला.
बाबरी मशिदीचा खटला दोन्ही बाजूंना न्याय देऊन निकालात निघाला. अयोध्येत भव्य राममंदिराची उभारणी झाली आणि आता अयोध्येतच भव्य मशिदीचे बांधकाम सुरू झाले आहे. यामुळेच पक्षकार इक्बाल अन्सारी यांनी निकालाबाबत समाधान व्यक्त केले होते. किंबहुना या निकालानंतर ते सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे जाहीरपणे कौतुक करीत असतात. मुख्यमंत्री योगी 28 वेळा अयोध्येला आले. दरवर्षी 5 तारखेला ते अयोध्येवर येऊन गरिबांना रेशनवर अन्नधान्य वाटपाची माहिती घेतात अशी वक्तव्य त्यांनी अलीकडे केली आहेत. यावरून संतप्त होऊन अयुब व त्यांच्या साथीदाराने त्यांच्यावर हल्ला केला.
इक्बाल अन्सारी हे त्यांच्या घराशेजारी असलेल्या मशिदीत अलविदा नमाज पढायला गेले तेव्हा त्यांना जाब विचारत अयुबने त्यांना धक्काबुक्की केली. अन्सारी यांनी याबाबत पोलिसांत तक्रार करताच पोलिसांनी अयुबसह चार जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.