डोंबिवलीत धोकादायक रासायनिक कंपन्याबाबत श्री गणेशोत्सवाच्या देखाव्यातून जागरुकता

0

डोंबिवली – औद्योगिक विभागात अनूदान व प्रोब्रेस या रासायनिक कंपन्यांमध्ये स्फोट होऊन अनेक कामगार मृत्युमुखी पडले. काहींना अपंगत्व आले तर सामान्य नागरिकांना मोठी आर्थिक व शारीरिक हानी सोसावी लागली. मात्र यानंतर काळच्या ओघात सर्व पडदयामागे गेले. आजही या घटनेची भीती संबंधित लोकांमध्ये आहेच. पण अशा धोकादायक रासायनिक कंपन्याबाबत नक्की निर्णय सरकार दरबारी होत नाही. त्यामुळे डोंबिवलीत धोकादायक रासायनिक कंपन्याबाबत श्री गणेशोत्सवाच्या देखाव्यातून जागरुकता निर्माण व्हावी यासाठी अशा गंभीर विषयाची आठवण एकता मंडळाने श्री गणेशोत्सवातून करून दिली आहे. कंपनीत होण्याऱ्या रिऍक्टर स्फोट बाबत जागरुकता आणा असा संदेश या मंडळाने दिला आहे. कंपनीत स्फोटमुळे झालेली राखरांगोळी देखाव्याच्या माध्यमातून सादर केली असून हा देखावे पाहण्यासाठी पूर्वेकडे नंदिवली क्रॉस रोडवर डोंबिवलीकर गर्दी करीत आहेत.

डोंबिवलीत अनूदान रासायनिक कंपनीमध्ये झालेल्या रिअॅक्टर स्फोटाच्या घटनेत १५ हून अधिक जणांचे बळी गेले. या स्फोटामुळे ९०० मालमत्तांचे नुकसान झाले. यात कंपन्यांचे २२ कोटी, तर १४ कोटी हे घरांचे असे मिळून एकूण ३६ कोटींचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले होते. तर प्रोब्रेस दुर्घटनेत सुमारे साडेसात कोटींचे नुकसान झाले होते. या दुर्घटनेत ६० जण जखमी झाले होते ही सर्व आठवण या निमित्ताने पुन्हा सर्वांसमोर आली आहे.

एकता मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांना असा हा देखावा उभा करण्यासाठी सुमारे एक महिन्याचा कालावधी लागल्याचे अध्यक्ष सुभाष वाळके यांनी सांगितले. मंडळाच्या तरुणांसह जेष्ठ महिला-पुरुषांनी यासाठी खूप मेहनत घेतली. मुख्य म्हणजे ज्या कंपनीत अशा प्रकारचे स्फोट झाले त्या ठिकाणी जाऊन तेथील वातावरणाचा अभ्यास करण्यात आला होता. त्यावेळच्या घटनेचे फोटो आणि प्रत्यक्षदर्शी लोकांच्या अनुभावाचे स्क्रिप्ट तरुण कार्यकर्त्यांनी शब्दलेखन करून आत्मसात करून घेतल्याचेही वळावे यांनी माहिती देतांना सांगितले. या सादरीकरणासाठी पुठा, कागद, रंग, माती याशिवाय चित्रीकरण व रेती-विटा असे साहित्य वापरण्यात आले आहे.

श्री गणेशोत्सवाचे हे 33 वे वर्ष असून या मंडळाने अनेक पारितोषिक मिळाली आहेत. मंडळाच्या माध्यमातून रक्तदान शिबिर याचबरोबर सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. अध्यक्ष सुभाष वाळके, उपाध्यक्ष रोहिदास साठे, सचिव उल्हास दळवी, उपसचिव केशव परब, खजिनदार अजित धुरी, उपखजिनदार रमेश नाईक तर सदस्य म्हणून सुधीर थोरात, भास्कर चौधरी, नाथा जाधव सुनीता पोवार, दिपश्री पितळे, अशोक कांबळे, निलेश हटकर मंडळाचे कामकाज पहात आहेत. आज पर्यंत या मंडळाला 22 उल्लेखनीय पुरस्कार मिळाले आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech