नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने जामीन मंजूर दिला आहे. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन देण्यात आला आहे. याआधी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा तुरूंगात जावं लागलं होतं. ईडीने केजरीवालांच्या जामीनाला ४८ तासांची स्थगिती देण्याची मागणी केली होती. मात्र ती न्यायालयाने फेटाळून लावली. दरम्यान शुक्रवारी न्यायाधीशांसमोर हे युक्तिवाद करता येतील, असं न्यायालयाने सांगितले.
दिल्ली अबकारी घोटाळ्यात २१ मार्चला केजरीवालांना ईडीने अटक केली होती. तेव्हा त्यांना सहा दिवसांच्या ईडी कोठडीत पाठविण्यात आले होते. आठ ते नऊ नोटीसांना केजरीवाल हजर न झाल्याने ईडीने ही कारवाई केली होती. ही अटक लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर झाल्याने आपने केजरीवालांचा जामीन मागितला होता. अनेकदा ईडीची कोठडी दिल्यानंतर केजरीवालांना निवडणुकीच्या प्रचारासाठी जामीन देण्यात आला होता. त्यानंतर निवडणूक संपताच त्यांना तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश देण्यात आले होते. आता त्यांना नियमित जामीन मिळाला आहे.