सातारा – सालाबाद प्रमाणे अनंत चतुर्दशीच्या अगोदर एकच दिवस सातारा शहरातील अनेक मान्यवर मंडळांनी वाहतुकीला अडथळा नको तसेच अनंत चतुर्दशी दिवशी होणारी रस्त्यातील गर्दी कमी करण्यासाठी आपल्या मंडळाच्या गणेश मूर्तीला सोमवारी सायंकाळीच विसर्जन मिरवणूक काढून निरोप दिला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.. जयघोषात या मिरवणुकीला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. सातारा शहरातील मानाचे शेटे चौकातील प्रकाश मंडळ यांच्या शंकर-पार्वती गणेशाची मिरवणूक निघाली. पुणे येथील राजकमल ब्रास बँड पथक तसेच रंगावली रांगोळी कलाकारांनी चौकाचौकात काढलेल्या रांगोळ्या विशेष लक्षवेधक ठरक होत्या त्यानंतर शहरातील मंडईचा राजा मंडळाची निघालेली मिरवणूक ही भव्य दिव्य अशी होती राजहंस ढोल व ताशा पथकाच्या कलाकारांनी केलेले ढोल व ताशांचे वादन सर्वसाधारण चे लक्ष वेधून घेणारे होते,माची पेठेतील बालस्फूर्ती मंडळ, यादव गोपाळ पेठेतील अजिंक्यतारा गणेश मंडळ केसरकर पेठेतील मयूर सोशल क्लब, पोवई नाका परिसरातील प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी बसवलेल्या गणेशाची मिरवणूक निघाली. त्याचप्रमाणे सातारा जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या बाल हनुमान गणेश मंडळाची मिरवणूकही पोलिसांनी साध्या वेशात अगदी धोतर, शर्ट, डोक्यावर टोपी घालून मोरयाच्या जयघोषात काढली.
सातारा शहरातील विसर्जन मिरवणुकी निमित्त अनेक मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले असून या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे सातारा जिल्हा पोलीस दलाचे मुख्य जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख व मान्यवर पदाधिकारी या मिरवणुकीच्यासाठी विशेष परिश्रम घेत असून ठीक ठिकाणी सीसी कॅमेरे पोलिसांचे गस्त पथक होमगार्ड आदी विशेष परिश्रम घेत आहेत अनंत चतुर्दशी दिवशी सकाळी मानाचा सम्राट महागणपती पंचमुखी मंडळ तसेच मोती चौकातील प्रतापसिंह गणेश मंडळाची मिरवणूक सुरू होईल. सायंकाळी पाच वाजता राजवाडा येथून सातारा नगरपालिकेच्या मध्यवर्ती गणेश मंडळाच्या मूर्तीचे आरती व पूजन होऊन मुख्य मिरवणुकीला सुरुवात होईल. यानिमित्त विविध ठिकाणी विसर्जन हौद तसेच विसर्जन तळी उभारण्यात आली असून राधिका परिसरातील मुख्य विसर्जन तयार मोठी महाकाय क्रेन मोठे गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी तैनात करण्यात आली आहे. विशेष विद्युत रोषणाईचा झोतामध्ये दिवस-रात्र हे विसर्जन तसेच त्यासाठी खास मर्चंट व्यवस्थाही करण्यात आली आहे. पालिकेच्या वतीने मूर्तींचे विसर्जनासाठी विशेष कर्मचारी पथक तैनात करण्यात आले आहे.
सातारचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले तसेच सातारा व जावली तालुक्याचे विद्यमान आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे वतीने तसेच सकल मराठा समाज संघाचे वतीने ही कन्या शाळा येथे या विसर्जन मिरवणुकीमध्ये विशेष स्वागत कक्ष उभारण्यात आले असून विविध मंडळांच्या मान्यवरांचे यावेळी या विसर्जन मिरवणूक सोहळ्यात स्वागत करण्यात येणार आहे. पोलिसांनी डीजे तसेच लेझर लाईटला बंदी घातली असून रात्री बारापर्यंत मिरवणुकांना वाद्य वाजवण्यास परवानगी देण्यात आली आहे. अनंत चतुर्दशीच्या आल्या दिवशी मुख्य विसर्जन तळ्यात सातारा येथे 46 गणेश मंडळांच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. तर, संपूर्ण जिल्ह्यात सातशे पस्तीस सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्तींना निरोप देण्यात आला. अनंत चतुर्दशी दिवशी जिल्ह्यातील 3250 सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तीचे व सुमारे एक लाख पाच हजारहून अधिक घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे.