मुंबई – काल रात्री एका सोसाट्याच्या वार्याने घाटकोपरला अनधिकृतपणे उभारलेले 120×120 फुटाचे सर्वात मोठे होर्डिंग कोसळले आणि 14 जणांचा बळी गेला. हे होर्डिंग ज्या ईगो मीडिया प्रा. लि. कंपनीचे आहे, त्या खासगी कंपनीचे भागीदार भावेश भिंडे यांच्या विरोधात पंतनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, भावेश सध्या फरार आहे. भावेश हा उबाठा निकटवर्ती होता हे दाखवण्याचा भाजपाचा जोरदार प्रयत्न सुरू असला तरी भावेश भिंडे हा बिझनेसमन होता आणि त्याचे सर्व पक्षांशी संबंध होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भावेश भिंडेच्या कंपनीला रेल्वेने काळ्या यादीत टाकले असूनही त्याच्या कंपनीला मुंबई महानगरपालिकेकडून होर्डिंग उभारण्याची कॉन्ट्रक्ट दिली जात होती. ही कॉन्ट्रक्ट कशी मिळाली याचा शोध घेणे आवश्यक आहे. भावेश भिंडे हा मुलुंडला राहतो. मुलुंडला त्याचे ईगो मीडिया प्रा. लि. कंपनीचे कार्यालय आहे. 5 सप्टेंबर 2016 रोजी या कंपनीची स्थापना झाली. मात्र त्या आधीपासून भावेश भिंडे हा होर्डिंग उभारून त्यावर जाहिराती लावण्याच्या व्यवसायात होता. रेल्वेचा तो सर्वात मोठा कंत्राटदार मानला जायचा. 2015 च्या डिसेंबर महिन्यात कुर्ल्याच्या सुमन नगर येथे 40×49 फूट होर्डिंग उभारणीवरून भावेश भिंडे, मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे यांच्यात वाद झाला. कोणतीही पूर्व परवानगी न घेता हे होर्डिंग उभारले, असा दावा पालिकेने केला आणि 21 जानेवारी 2015 रोजी पालिकेने या होर्डिंगसह आणखी एक वादग्रस्त होर्डिंग काढून टाकले. यानंतर 2019 मध्ये रेल्वेने लायसन्स फी देण्यावरून भावेश भिंडेच्या कंपनीला काळ्या यादीत टाकले आणि रेल्वेकडून त्याला होर्डिंगचे कंत्राट देणे बंद झाले. मात्र त्यानंतरही मुंबई महानगरपालिका त्याला होर्डिंगची परवानगी देत राहिली. काल पडलेल्या होर्डिंगला रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालीद यांनी 2021 साली 10 वर्षांसाठी परवानगी दिली होती. मात्र होर्डिंगचा आकार नियमात बसत नसल्याने पालिकेने भिंडे याला नोटीस बजावली होती. यावर कारवाई होण्यापूर्वीच काल दुर्घटना घडली.
भावेश भिंडे याचे उध्दव ठाकरे यांच्या बरोबरील छायाचित्र पोस्ट करून भाजपाचे नेते राम कदम व इतर हे भिंडे याला उबाठाचा आशीर्वाद होता असे दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र भिंडे याचे सर्व पक्षांच्या नेत्यांशी संबंध होते. किंबहुना सध्या शिंदे गटात असलेले भाजपाच्या छत्रछायेखाली वावरणारे यशवंत जाधव हे अनेक वर्षे महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष राहिल्याने भावेश भिंडे याला दिल्या जाणार्या परवानग्यांंबाबत पोलिसांनी त्यांची सर्वात आधी
चौकशी केली पाहिजे.