मुंबई – उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून काही विलंबाने धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वेचे वेळापत्रक पाहून प्रवाशाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर उद्या सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या गाड्या माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील. हार्बर रेल्वेच्या ठाणे-वाशी/नेरळ अप आणि डाउन मार्गावर सकाळी ११. १० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत ठाणे येथून वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सुटणाऱ्या आणि वाशी/नेरुळ/पनवेल येथून ठाणे करीता सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द राहतील. पश्चिम रेल्वेच्या माहीम ते अंधेरी मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे सीएसएमटी – वांद्रे – सीएसएमटी तर सीएसएमटी -गोरेगाव – सीएसएमटी मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत. चर्चगेट ते गोरेगाव दरम्यानच्या काही लोकल फेऱ्याही रद्द करण्यात आल्या आहेत.