नवी दिल्ली : सध्या केंद्रात मजबूत सरकार असून हे मजबूत सरकार दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारतं, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडच्या ऋषीकेशमध्ये केलं होतं. यावरून अमेरिकेने भारताला मोलाचा सल्ला दिला आहे. भारत-पाकिस्तान वादात आम्हाला हस्तक्षेप करायचा नाही, परंतु दोन्ही देशांनी सामंजस्याने संवाद साधावा, असं अमेरिकेने म्हटलं आहे. अमेरिकेचे उच्च अधिकारी मॅथ्यू मिलर हे एका पत्रकार परिषदेत संबोधित करत होते. तेव्हा त्यांना आंतरराष्ट्रीय मुद्द्यांबाबत विचारण्यात आले. ते म्हणाले, दोन्ही देशातील वाद संपुष्टात आणण्याची आम्ही विनंती करतो. या वादात अमेरिका मध्यस्ती करणार नाही. परंतु, दोन्ही देशातील वाद चर्चेद्वारे सोडवावा असं आम्ही आवाहन करतो.
“आज देशात मजबूत सरकार आहे. मजबूत मोदी सरकार, दहशतवाद्यांना घरात घुसून मारतं. युद्धक्षेत्रातही भारतीय तिरंगा सुरक्षिततेची हमी बनला आहे. सात दशकांनंतर, जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्यात आला आणि तिहेरी तलाकविरोधात कायदा करण्यात आला. यामुळे संसदेत ३३ टक्के आरक्षण सुनिश्चित केले आणि सामान्य श्रेणीतील गरीबांनाही १० टक्के आरक्षण मिळाले”, असे पंतप्रधान म्हणाले. दरम्यान, ब्रिटिश वृतपत्र द गार्डियनने ५ एप्रिल रोजी भारताने पाकिस्तानात अनेकांची हत्या केल्याचा आरोप असलेले वृत्त प्रसिद्ध केले होते. परंतु, हे वृत्त भारतविरोधी प्रचाराचे असून वृत्त फेटाळून लावले आहे. यावेळीही अमेरिकेने कोणाचीही बाजू घेणार नसल्याचं सांगितलं होतं.