नवी दिल्ली – भारताची कोळश्याची गरज पूर्ण करताना ऊर्जा क्षेत्रालाही बळकटी देणाऱ्या कोल इंडिया लिमिटेड (CIL) या सरकारी मालकीच्या कंपनीने १ नोव्हेंबर २०२४ रोजी ५० व्या वर्षात पदार्पण केले आहे. राष्ट्रीयीकृत कोकिंग कोल (१९७१) व नॉन कोकिंग खाणी (१९७३) यांची शिखर होल्डिंग कंपनी या नात्याने CIL १ नोव्हेंबर १९७५ रोजी जन्माला आली. CIL च्या स्थापना वर्षात म्हणजे १९७५-७६ साली झालेल्या ८९ मिलियन टन उत्पादनापासून सुरुवात करणाऱ्या या महारत्न कोळसा कंपनीने कोळसा मंत्रालयांतर्गत कार्यरत असताना आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ७७३. ६ मिलियन टन म्हणजे ८.७ पट अधिक उत्पादनाचा टप्पा पार केला आहे. CIL चे ८०% कोळसा उत्पादन अतिशय रास्त दराने वीज उत्पादक क्षेत्राला दिले जाते आणि अशा रीतीने नागरिकांना वाजवी दरात वीज पुरवठा होतो आहे.
राष्ट्रीयीकरणानंतरच्या काळात असलेली ६.७५ लाख कर्मचारी संख्या आता एक तृतीयांशाने घटून फक्त २. २५ लाख इतकी उरली आहे, तरीही उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. केंद्रीय कोळसा व खाण मंत्री जी किशन रेड्डी कोल इंडिया चे अभिनंदन करताना म्हणाले, “ सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या कोल इंडियाने आतापर्यंत अनेक मैलाचे दगड पार केले आहेत. मी कंपनीला शुभेच्छा देत आहे. भारताच्या कोळसा क्षमतेचा उच्चांक अद्याप गाठला गेलेला नाही. खर्चिक आयात कमी करण्यासाठी कोळशाचे देशांर्तगत उत्पादन वाढवण्याची गरज आहे. त्यासोबतच लोकाभिमुख सामाजिक जबाबदारीची जाणीव, लोककल्याण व सुरक्षितता यांनाही तितकेच महत्व दिले पाहिजे.”
CIL चा गेल्या ५ दशकांचा प्रवास अनेक महत्वाच्या घटनांनी अंकित झालेला आहे. कंपनीने अनेक आव्हाने व बदल तसेच कसोटीचे प्रसंग व समस्या समर्थपणे पेलत अपेक्षेप्रमाणे कार्यक्षमता दाखवली आहे. मुळात फक्त कोळसा उत्पादन करणाऱ्या कोल इंडियाने आता सौर ऊर्जा, पिटहेड ऊर्जा केंद्रे, कोळशाचे वायूत रूपांतरण व अतिमहत्वाच्या खनिजाचे उत्पादन करून राष्ट्रहिताला हातभार लावला आहे.