पंतप्रधान मोदी ४५ तास ध्यानमुद्रेत

0

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावताच पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी सायंकाळी तामिळनाडूत पोहोचले आणि तेथील विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये ध्यान सुरू केले. सायंकाळी ६.४५ वाजता ते ध्यानमुद्रेत बसले. तब्बल ४५ तास ते त्याच अवस्थेत राहणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी भगवती अम्मन मंदिरात जाऊन पूर्जाअर्चा केली आणि त्यानंतर त्यांनी ध्यानधारणा सुरू केली.

मागच्या ३ महिन्यांपासून सुरू असलेला लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपवून पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी सायंकाळी वाराणसी येथून तिरुवनंतपुरम येथे दाखल झाले. त्यानंतर तेथून ते हेलिकॉप्टरने तामिळनाडूमधील कन्याकुमारी येथे दाखल झाले. त्यानंतर त्यांनी भगवती अम्मन मंदिरात पूजा केली. यावेळी तेथील पुजा-यांनी त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. त्यानंतर विशेष बोटीने ते विवेकानंद रॉक शिलास्मारकावर पोहोचले. तेथे त्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ््याला पुष्पमाला अर्पण केली आणि काही वेळ विश्रांती घेऊन ४५ तासांचे मौनव्रत सुरू केले, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयातून देण्यात आली. ज्या ठिकाणी स्वामी विवेकानंद ध्यानाला बसले, त्या ठिकाणी पंतप्रधान मोदी दोन दिवस अखंड ध्यानधारणा करणार आहेत. ते १ जून रोजी मौनव्रत करून दिल्लीला रवाना होणार आहेत. मोदींच्या दौ-याच्या निमित्ताने कन्याकुमारी येथे कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech