काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे शिंदे गटात

0

मुंबई – लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले असून अनेक बडे नेते काँग्रेसची साथ सोडत असताना आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. प्रसारमाध्यमांसमोर काँग्रेसची बाजू रोखठोकपणे मांडणारे काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते राजू वाघमारे यांनी आज पक्षाची साथ सोडली असून, त्यांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राजू वाघमारे म्हणाले की, काँग्रेस पक्षाची सध्याची स्थिती आणि काँग्रेस पक्षाची सध्या होत असलेली फरफट, एका राष्ट्रीय पक्षाची एका प्रादेशिक पक्षाने केलेली ससेहोलपट पाहता आणि काँग्रेस पक्षामधील काही नेत्यांच्या स्वार्थी आणि गलिच्छ राजकारणामुळे व्यथित होऊन मी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

ते पुढे म्हणाले की, ज्या पद्धतीने काँग्रेस पक्ष काम करतोय, तसेच कुणाचाच कुणामध्ये नसलेला पायपोस, महाराष्ट्रातील काही नेत्यांच्या हाताखाली दबलेला काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष काम करतोय का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशी परिस्थितीत मुंबई उत्तर पश्चिमची जागा संजय निरुपम यांनी मागितली तेव्हा त्यांनी जागा मागू नये यासाठी त्यांच्यावर पक्षांतर्गत दबाव आणला गेला. त्यांना शेवटी पक्षातून बाहेर काढण्यात आले. आज सांगलीच्या जागेसाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना टाचा घासाव्या लागत आहेत. ठाकरेसेनेने तिथे उमेदवार जाहीर करून टाकला आहे. यातून काँग्रेसची राज्यातील परिस्थिती काय आहे, हे दिसत आहे, असा टोला राजू वाघमारे यांनी लगावला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech