बेरहामपूर- तृणमूल काँग्रेसचे बेरहामपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार तथा माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणला निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रध्वजाचा वापर न करण्याच्या सूचना मुर्शिदाबादच्या जिल्हाधिकारी राजश्री मित्रा यांनी दिल्या आहेत. त्याचप्रमाणे टी-२० क्रिकेट विश्वकरंडकाच्या विजयाचे चित्र प्रचारफलकांवर लावण्यासही युसूफ पठाणला मनाई करण्यात आली आहे.
तृणमूलने इंडिया आघाडीशी फारकत घेत पश्चिम बंगालमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला व उमेदवारांची स्वतंत्र यादी जाहीर केली होती. या यादीमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीररंजन चौधरी यांच्या बेरहामपूर मतदार संघातून माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणला निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने येथील लढत लक्षवेधी झाली आहे. दरम्यान, युसूफ पठाणच्या प्रचाराच्या फलकांवर टी-२० विश्वचषक विजयाचे आणि राष्ट्रध्वजाचे छायाचित्र वापरण्यात येत होते. यावरून काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत राज्याच्या अतिरिक्त मुख्य निवडणूक आयुक्तांनी पठाणला राष्ट्रध्वज आणि टी-२० विश्वकरंडक विजयाचे छायाचित्र न वापरण्याबाबत आदेश दिले.