दाना चक्रीवादळ धडकण्याची शक्यता, भारतीय नौदलाची पूर्वतयारी

0

नवी दिल्ली – ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता असलेल्या दाना चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी भारतीय नौदलाकडून मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण अभियान राबवण्यासाठी पूर्वतयारी सुरु आहे. पूर्व नौदल कमांडने, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील नौदल अधिकाऱ्यांच्या प्रभारींबरोबर समन्वयाने, सर्वसमावेशक आपत्ती प्रतिसाद यंत्रणा सक्रिय केली आहे.राज्य प्रशासनाने मागणी केल्यास अत्यावश्यक पुरवठा आणि वैद्यकीय सहाय्य देण्यासाठी कमांड बेस व्हिक्तुअलिंग यार्ड, मटेरियल ऑर्गनायझेशन आणि नौदल रुग्णालय आयएनएचएस कल्याणी यांसारख्या युनिट्सच्या सहकार्याने काम करत आहे.

या तयारीचा एक भाग म्हणून, अत्यावश्यक कपडे, पिण्याचे पाणी, अन्न, औषधे आणि आपत्कालीन मदत सामग्री चक्रीवादळामुळे बाधित होण्याची शक्यता असलेल्या भागातील प्रमुख स्थानांवर रस्तेमार्गे रवाना करण्यात आली आहे. याशिवाय, गरज पडल्यास समन्वित बचाव आणि मदत कार्यात मदत करण्यासाठी पथक तयार ठेवण्यात आले आहे. या मदत कार्यास समुद्रातून मदत देण्यासाठी, पूर्व नौदलाच्या ताफ्यातील दोन जहाजे पुरवठा आणि बचाव तसेच पाणबुड्यांच्या चमूसह उभी आहेत. भारतीय नौदल अत्यंत दक्षपणे परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करत असून चक्रीवादळ दानामुळे प्रभावित झालेल्या नागरी अधिकारी आणि लोकांना मदत पुरवण्यासाठी तयार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech