मुंबई – हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांवर आली आहे. मराठवाड्यात घागरभर पाण्यासाठी करावी लागणारी कसरत शब्दात सांगता येणारी नाहीय. मराठवाड्यात 1837 टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. यावरून याची दाहकता लक्षात येईल. हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा वणवण करणाऱ्या जनतेला वाऱ्यावर सोडून मंत्री परदेशात गेले आहेत.
पाणीटंचाईप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. मात्र, पालकमंत्र्यांना याचं काही देणं घेणं आहे की नाही असा प्रश्न निर्माण झालाय. तीव्र पाणी टंचाईच्या छळा सोसणाऱ्या जनतेला वाऱ्यावर सोडून पालकमंत्री मात्र परदेशात कुटुंबांसोबत थंड व्हायला गेलेत. तर कुणी देवदर्शनाला. पाणीटंचाईवर मुख्यमंत्र्यांनी संभाजीनगरला बोलवलेल्या बैठकीला चक्क अनेक पालकमंत्र्यांनीच दांडी मारली. मुख्यमंत्री शिंदे मुंबईवरून संभाजीनगरला पोहोचले.. मात्र पाणीटंचाईचं गांभिर्य नसेलेले पालकमंत्र्यांनी मात्र बैठकीला दांडी मारली. बीडमध्ये माणसांसोबत जनावरांनाही पाणीटंचाईच्या छळा सोसाव्या लागताहेत.
बीड जिल्ह्यात 434 टँकरने पाणी पुरवठा केला जातोय. पालकमंत्री धनंजय मुंडे परदेशात आहेत. हिंगोलीमध्ये पाण्यासाठी लोकांची भटकंती, विहिरी तलावांनी तळ गाठलाय. जिल्ह्यातील अनेक गांवांमध्ये टँकर सुरू आहे. पालकमंत्री अब्दूल सत्तार परदेशात आहेत. जालना जिहल्यात सहा मध्यम प्रकल्प कोरडे पडलेत. शहरी आणि ग्रामीण भागात तीव्र पाणीसंकट आहे. जिल्ह्यात 495 टँकर सुरू आहेत. पालकमंत्री अतुल सावे देवदर्शनाला गेले आहेत.
परभणी – जिल्ह्यातील 8 प्रकल्प कोरडेठाक पडलेत.. अनेक प्रकल्प मृतसाठ्यात गेलेत. पालकमंत्री संजय बनसोडे देवदर्शनाला तिरुपतीला गेलेत. संभाजीनगर – मराठवाड्यातील संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई आहे. तब्बल 698 टँकरमधून पाणी पुरवठा केला जातोय. पालकमंत्री संदीपान भुमरेंची बैठकीला दांडी. पाणीटंचाईचं संकट गहिरे झाले आहे.
शरद पवार यांनी राज्यातील दुष्काळी स्थितीबाबत चिंता व्यक्त केलीये. त्यांनी राज्यातील 40 तालुक्यांत परिस्थिती गंभीर असल्याचं म्हटलंय. त्याचबरोबर 73 टक्के महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय…तर शरद पवारांनी राज्य सरकार असंवेदनशील असल्याचा टोला लगावलाय.
त्याचबरोबर सरकार दुष्काळाबाबत गंभीर नसेल तर त्यांना जागं करण्याचे इतरही उपाय असल्याचं पवार म्हणालेत. तर, शरद पवार आणि विरोधी पक्ष नकारात्मक मानसिकतेत गेल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय…निवडणूक असूनही दुष्काळीभागात टँकरसह पाण्याचं व्यवस्थापन करण्यात आल्याचा दावा फडणवीसांनी केलाय. दुष्काळासारख्या गोष्टीवर राजकारण पवारांसारख्या मोठ्या नेत्याला शोभत नाही.
राज्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती गंभीर बनत चाललीय.. धरणांमधील पाणीपातळी झपाट्याने तळ गाठतेय.. घोटभर पाण्यासाठी राज्यातल्या जनता मैलोन मैल, उन्हातान्हातून पायपीट करतेय.. तर दुसरीकडे या जनतेचे पालकमंत्री म्हणवणारे परदेशात थंड कॉफीचे घोट रिचवतायत. विधानसभेला जेव्हा मतदान करायला जाल तेव्हा दुष्काळातले हे चटके नक्की लक्षात ठेवा..