नवी दिल्ली- दिवाळीत आपल्या व्यवसायाचा विस्तार करणाऱ्या उद्योजकांना केंद्र सरकारने मोठी भेट दिली आहे. आता त्यांना पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत पूर्वीपेक्षा दुप्पट कर्ज मिळू शकणार आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत, मुद्रा कर्जाची मर्यादा सध्याच्या 10 लाख रुपयांवरून 20 लाख रुपये करण्यात आली आहे. या निर्णयाबाबत सरकारने अधिसूचनाही जारी केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024-25 चा अर्थसंकल्प सादर करताना घोषणा केली होती की, पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत 10 लाख रुपयांची कर्ज मर्यादा वाढवून 20 लाख करण्यात येईल. आता या घोषणेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयाने सांगितले की, ही मर्यादा वाढवल्याने मुद्रा योजनेचे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत होईल. तसेच व्यवसायाच्या वाढीसाठी आणि विस्तारासाठी अधिक निधीची गरज असणाऱ्या उद्योजकांना याचा लाभ होईल.
सध्या पंतप्रधान मुद्रा योजनेत शिशु, किशोर आणि तरुण अशा तीन श्रेणी आहेत, ज्या अंतर्गत कर्ज दिले जाते. आता तरुण प्लसनावाची नवीन श्रेणी सुरू करण्यात आली आहे. मुद्रा योजनेत शिशु अंतर्गत 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज देण्याची तरतूद आहे. किशोर योजनेअंतर्गत, व्यवसाय करणारे 50 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंतचे मुद्रा कर्ज घेऊ शकतात. तरुण योजनेंतर्गत 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याचा नियम आहे. आता तरुण योजनेंतर्गत घेतलेले कर्ज यशस्वीरीत्या परत केलेल्या व्यावसायिकांना त्यांचा व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी तरुण प्लस श्रेणीचा लाभ घेता येईल. या योजनेत अशा उद्योजकांना 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे. पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत, मायक्रो युनिट्ससाठी क्रेडिट गॅरंटी फंड अंतर्गत २० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर हमी कव्हरेज दिले जाईल.