नवी दिल्ली – आता सुप्रीम कोर्टही व्हॉट्सअप सेवा सुरू करणार आहे. ही व्हॉट्सअप सेवा वकिलांसाठी असणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या अधिकृत व्हॉट्सअपवर खटल्यासंदर्भात मेसेज पाठवले जाणार आहेत. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनीच ही माहिती दिली आहे.
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितले की, वकिलांना दाखल खटले, सुनावणी होणारे खटले यांची व्ह़ॉट्सअपरवर यादी पाठवली जाईल. न्यायालयात सुनावणी होणाऱ्या प्रकरणांची यादी तयार करण्यात येत असते.यामुळे त्या संबंधित दिवशी नेमकी कोणती प्रकरणे सुनावणीसाठी आहेत हे आधीच वकिलांना समजणार आहे. न्यायालयाने ७५ व्या वर्षी एक छोटेसे पाऊल टाकले असून ही नवी मोहीम सुरू केली आहे. याचा मोठा परिणाम दिसून येण्याची क्षमता आहे.
या व्हॉट्सअप क्रमांकावर कोणताही कॉल किंवा मेसेज पाठविता येणार नाही. न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर याचिकांमुळे उद्भवलेल्या एका जटिल कायदेशीर प्रश्नावर सुनावणी सुरू होण्यापूर्वी सरन्यायाधीशांनी ही घोषणा केली.