यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्या तरुणीचा अकोल्याच्या पोलिस निरीक्षकाकडून विनयभंग

0

अकोला – अकोल्यातील खदान पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक धनंजय सायरे यांच्यावर नागपुरात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपुरातील नंदनवन पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यूपीएससीचा अभ्यास करीत असलेल्या एका २२ वर्षीय तरुणीची छेडखानी केल्याचा ठपका पोलिस निरीक्षक धनंजय सायरे यांच्यावर ठेवण्यात आला. या प्रकरणामुळे अकोला पोलिस प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे. तसेच या प्रकाराने पुन्हा एकदा अकोला पोलिसांवर नामुष्कीची वेळ आली आहे.

अकोला शहर पोलिसांना नेमके झाले तरी काय, असा प्रश्न उपस्थित करण्यामागे कारण ठरतय ते सतत घडणारे धक्कादायक प्रकार. काही दिवसांपूर्वीच शहरातील एका बड्या डॉक्टरविरुद्ध तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेला अकोला पोलिसांनी तब्बल चार दिवस तक्रार न घेता रात्री उशिरापर्यंत ताटकळत ठेवले, असा आरोप एका महिलेने केला होता. हे प्रकरण ताजे असताना अकोला शहरातील एका पोलिस हवालदाराने तक्रार करण्यास आलेल्या एका महिलेला शरीरसुखाची मागणी केल्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला होता.

तर त्या आधी जानेवारी महिन्यात गोवर्धन हरमकार या तरुणाचा पोलिस मारहाणीत मृत्यू झाला होता. मृतकांच्या नातेवाईकांनी अकोट शहर पोलिसांवर अनेक गंभीर आरोप केले होते. त्या त्यानंतर ठाणेदारासह पाच कर्मचा-यांची बदली करण्यात आली होती. अशातच आता अकोल्यातील खदान पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक धनंजय सायरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने अकोला पोलिसांचे नाव चर्चेत आले आहे.

हाती आलेल्या प्रथमिक माहितीनुसार, नागपुरातील नंदनवन भागात राहणा-या एका २२ वर्षीय युवतीची धनंजय सायरे यांच्याशी ओळख झाली होती. त्यावेळी ही युवती यूपीएससीच्या परीक्षेची तयारी करीत होती. दरम्यान, या ओळखीतून धनंजय सायरे यांनी या युवतीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने नकार दिल्यावर छेड काढत विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. युवतीच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी धनंजय सायरे यांच्याविरुद्ध भादवि कलम ३५४ अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास नंदनवन पोलिस करीत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech