सोन्याची बिस्किटे, चांदीच्या विटा, महागडे दागिने, रोकड जप्त

0

मुंबई – जिजाऊ मल्टिस्टेट सहकारी बँकेतील १०० कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आरोपींच्या यादीत नाव समाविष्ट करण्याची भीती दाखवून व्यावसायिकांकडून लाच उकळण्याचा प्रयत्न करणा-या पोलिस निरीक्षकाने लाखो रुपयांची आर्थिक माया जमा केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्या घरावर धाड टाकली. त्यावेळी खाडेच्या घरात सोन्याची बिस्कीट, चांदीच्या विटा, सोन्याचे महागडे दागिने आणि नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली.

एसीबीच्या अधिका-यांनी हरिभाऊ खाडे यांच्या घराची झाडाझडती सुरू केली तेव्हा एक-एक करुन मुद्देमाल सापडत गेला. यावेळी एका बॅगेत ५०० च्या नोटांची बंडलं आढळून आली. हे सर्व पैसे मोजण्यासाठी एसीबीच्या अधिका-यांना मशीनचा वापर करावा लागला. यावेळी खाडे यांच्या नावावर पाच ते सहा ठिकाणी असलेल्या मालमत्तांची कागदपत्रेही पोलिसांच्या हाती लागली आहेत.

बीड शहरातील जिजाऊ मल्टीस्टेट सहकारी बँकेमध्ये गेल्यावर्षी १०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता. या प्रकरणात बँकेचे प्रमुख बबन शिंदे तसेच अध्यक्ष अनिता शिंदे यांच्यासह चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या हरिभाऊ खाडे यांच्याकडे होता. त्यांनी या दोघांकडे ५० लाखांची मागणी केली. त्यानंतर ३० लाख देण्याचे ठरले आणि त्यांनी कुशल जैन यांच्याकडे पहिला हप्ता ५ लाख देण्यास सांगितले. मात्र, याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यावेळी सापळा रचून कुशल जैनला रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे व सहाय्यक फौजदार रवीभूषण जाधवर फरार झाले आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech