मुंबई – हाजी अली दर्ग्यात बॉम्ब ठेवल्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून ताडदेव पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी सायंकाळी हाजी अली दर्गा ट्रस्टच्या कार्यालयात आलेल्या फोनमध्ये आरोपीने दर्ग्यात बॉम्ब ठेवला असल्याचे सांगितले व दर्गा तातडीने खाली करण्याची धमकी दिली. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपले नाव पवन असल्याचे सांगितले व अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत दर्ग्याविषयी वादग्रस्त वक्तव्ये केली.
धमकी देणाऱ्या पवनविरुद्ध ताडदेव पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये कलम 351(2), 352, 353(2), 353(3) अंतर्गत गुन्ह्यांचा समावेश आहे. हाजी अली दर्गा ट्रस्टच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांत या प्रकरणाची तक्रार नोंदवली आहे. सध्या पोलिस अधिक तपास करत आहेत. धमकीचा हेतू काय होता याचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांच्या मते, आरोपी मानसिकरुग्ण असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.