High Court relief to actor Jackie Shroff
नवी दिल्ली – विना परवानगी आपले नाव, फोटो, आवाज आणि भिडू शब्द वापरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि २ कोटी १ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका जॅकी श्रॉफ यांनी दाखल केली होती. त्यावर कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा आवाज, नाव आणि छायाचित्रे व्यावसायिक कारणासाठी वापरता येणार नाहीत, असे दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे जॅकी श्रॉफ यांना दिलासा मिळाला आहे.
उच्च न्यायालयाने जॅकी श्रॉफ यांचे नाव, त्यांची टोपणनावे जॅकी आणि जग्गू दादा, आवाज आणि छायाचित्रे वापरण्यास बंदी घातली आहे. मंगळवारी जॅकी श्रॉफ यांनी दिल्ली उच्च न्यायालयात या प्रकरणी धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती संजीव नरुला यांच्या एकल खंडपीठासमोर सुनावणी झाली. “जॅकी श्रॉफ यांचा आवाज, नाव आणि छायाचित्रे वापरणाऱ्या ई-कॉमर्स वेबसाइटवर, टी-शर्ट आणि पोस्टर इत्यादी विकणाऱ्या संस्था आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआप) चॅटबॉट प्लॅटफॉर्मवर बंदी घातली जाईल, असे यावेळी नरुला यांनी स्पष्ट केले. तसेच जॅकी श्रॉफ यांच्या वैशिष्ट्यांचा गैरवापर करून त्यांच्या व्यक्तिमत्त्व आणि प्रसिद्धीच्या अधिकाराचे उल्लंघन करण्यात येत ओहे. असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले. दरम्यान, जॅकी यांचे वकील प्रवीण आनंद यांनी न्यायालयाला सांगितले होते की, “जॅकी यांची प्रतिमा डागाळत आहे. अश्लील मीम्समध्ये त्यांच्या नावाचा, आवाजाचा गैरवापर केला जात आहे. त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन थांबविण्यात यावे. अभिनेत्याची जॅकी श्रॉफ, जॅकी, जग्गू दादा आणि भिडू अशी वेगवेगळी नावे कोणत्याही व्यासपीठावर वापरण्यास बंदी घालण्यात यावी.”