२००४ साली राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रिपदासाठी योग्य नेता नव्हता

0

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी, २० मे रोजी होणार आहे. शरद पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. २००४ साली राज्यात राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या मात्र, त्यावेळेस पक्षात मुख्यमंत्रिपदासाठी योग्य उमेदवार नव्हता असा दावा शरद पवार यांनी केला आहे. यासोबतच त्यावेळी जर छगन भुजबळ यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातली असती तर पक्ष फुटला असता असा धक्कादायक खुलासाही पवार यांनी केला.

शरद पवार यांनी एका माध्यमसमूहाला दिलेल्या मुलाखतीत आज हा दावा केला. राष्ट्रवादी पक्षाची स्थापना १९९९ मध्ये केली. त्याच्या पाच वर्षांनंतर २००४ मध्ये राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्या. त्यावेळी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री करता आला असता, मात्र त्यावेळी आमच्याकडे त्या तोडीचा नेता नव्हता, असे पवार म्हणाले. २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ७१ तर काँग्रेसला ६९ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतरही काँग्रेसचे वरिष्ठ नेते विलासराव देशमुख यांनाच मुख्यमंत्री बनवण्यात आले होते.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हाच मुद्दा पकडून २००४ साली राष्ट्रवादी पक्षातील काही नेत्यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी शरद पावरांकडे केली होती. मात्र, शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपद काँग्रेसला देऊन राष्ट्रवादीसाठी जास्त मंत्रिपद मिळवले . शरद पवारांच्या या निर्णयावर अजित पवार सध्या टीका करताना दिसत असून, शरद पवारांनी त्यावेळी आमच्याकडे योग्य नेता नव्हता असे सांगून अप्रत्यक्षपणे अजित पवारांनाच टोला लगावला आहे.

यावेळी बोलताना पवारांनी असेही म्हटले की, एकनाथ शिंदे यांना २०१९ साली मुख्यमंत्री करण्यास आमचा विरोध नव्हता, मात्र त्यांचे नावच आमच्या समोर आले नाही. तर प्रफुल्ल पटेल हे २००४ पासूनच भाजपसोबत जाण्यासाठी उत्सुक होते, असेही पवार म्हणाले. यासोबतच मी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात कधीही भेदभाव केला नाही. मी सर्वांनाच पक्षात काम करण्याची संधी दिली. यामुळे पक्षात काम करणा-यांना संधी मिळाली नाही, असे अजित पवार म्हणतात ते चुकीचे आहे, असेही शरद पवारांनी मुलाखतीदरम्यान सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech