नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांत परदेशात स्थायिक होणाऱ्या भारतीयांचं प्रमाण वाढलं आहे. शिक्षण, नोकरी आणि व्यवसायाकरता तरुणाई परदेशात स्थायिक होत आहे. तरुणाईच्या या मानसिकतेला भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी विराट कोहलीची मानसिकता असं संबोधलं आहे. जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीमध्ये ‘मेकिंग इंडिया ॲन ॲडव्हान्स्ड इकॉनॉमी २०४७: व्हॉट विल इट टेक’ या परिषदेत रघुराम राजन बोलत होते. “मोठ्या प्रमाणात भारतीय तरुणाई भारतात आनंदी नसल्याने परदेशात स्थायिक होत आहेत. आजची तरुणाई ही विराट कोहलीच्या मानसकितेची आहे, असं ते म्हणाले. ते अशा ठिकाणी जातात जिथे त्यांना बाजारपेठेत प्रवेश करणं सोपं वाटेल, असंही ते म्हणाले.
भारतीय तरुण त्यांचा व्यवसाय परदेशात सुरू करत आहेत. त्यांना त्यांचा व्यवसाय जागतिक स्तरावर विस्तार करायचा आहे. माझ्या मते भारतातील तरुणाईमध्ये विराट कोहलीची मानसिकता आहे. आपणच सर्वांत पुढे आहोत. कारण आता बरेच भारतीय नवसंशोधक सिंगापूर आणि सिलिकॉन व्हॅली येथे स्थायिक होत आहेत. तसंच, तरुणाईने भांडवल सुधारणा आणि कौशल्य वाढवण्यावर भर दिला पाहिजे, असंही राजन म्हणाले. रघुराम राजन पुढे म्हणाले की, याबाबत त्यांच्याशी बोलणं गरजेचं आहे. आम्ही काही भारतीय तरुणांशी परदेशात स्थायिक होण्याबाबत विचारले. त्यापैकी अनेक तरुण उद्योजकांनी जग बदलण्याची इच्छा व्यक्त केली. तर, अनेकांनी भारतात आनंदी नसल्याचं कारणही दिलं.