जपानचे स्लिम लुनार लँडरचा दुसऱ्या रात्रीही कार्यरत

0

टोकियो – जपानच्या ‘स्लिम’ (स्मार्ट लँडर फॉर इन्वेस्टीगेटिंग मून) या लुनार लँडर चांद्रभूमीवर उतरताच कोलमडले होते. त्यावेळी त्याच्या सोलर पॅनेलची दिशा हलल्यामुळे लँडरला ऊर्जा मिळत नव्हती. मात्र त्यातील बिघाड दुरुस्त केल्यानंतर आता या लँडरने थक्क करणारा चिवटपणा दर्शवला आहे.

या लँडरने चंद्रावरील चौदा दिवसांतील दुसऱ्या रात्रीही आपण ‘जिवंत’ असल्याचे दाखवले आहे. विशेष म्हणजे, चंद्रावरील दीर्घ रात्रीच्या वेळीही ते टिकून राहिल, असे त्याचे डिझाईन बनवलेले नव्हते. तरीही हे लँडर दोन रात्री उलटूनही टिकले ही आश्चर्याची गोष्ट ठरली आहे.

हे लँडर यशस्वीपणे चंद्रावर उतरवणारा जपान जगातील पाचवा देश बनला होता. यापूर्वी अमेरिका, रशिया, चीन आणि भारताने चंद्रावर आपले लँडर यशस्वीपणे उतरवले आहे. आता ‘स्लिम’ने चंद्रावरील दीर्घ आणि थंड अशा दोन रात्रींचा सामना करून आपले काम सुरू ठेवले आहे. मिशन टीमने ‘एक्स’वरून ही माहिती दिली. या लँडरच्या नेव्हीगेशन कॅमेऱ्याने टिपलेला एक फोटोही ‘जाक्सा’ने (जपानी अंतराळ संशोधन संस्था) शेअर केला आहे. दरम्यान, हे लँडर सप्टेंबर २०२३ मध्ये चंद्राकडे पाठवण्यात आले होते. ते १९ जानेवारी २०२४ रोजी चांद्रभूमीवर उतरले होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech