जालना – देशात लोकसभेच्या निवडणुकीसाठी पाच टप्प्यांत मतदान पार पडले. आता आणखी दोन टप्पे बाकी आहेत. तर महाराष्ट्रातील पाचही टप्प्यांतील मतदान पार पडलेले आहे. या लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. त्यानंतर काही महिन्यातच महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीची रंगत संपताच विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार उभे करण्यासंदर्भात अनेकदा सूचक विधाने केली आहेत. असे असतानाच त्यांनी आता पुन्हा एकदा मोठं विधान केलं आहे. “वेळ आली तर आपला उमेदवार द्यायचा नाही. पण त्यांना पाडल्याशिवाय शांत बसायचं नाही”, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. त्यामुळे त्यांच्या विधानाचा रोख नेमकं कुणाकडे आहे? यासंदर्भात आता तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.
“काहींचं म्हणणं होतं की मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळवून द्यायचं नाही. काहींचं म्हणणं आहे की, मी जातीवाद करतो. सगळ्याचं म्हणणं आहे मराठा आणि ओबीसी वाद होत आहे. मात्र, हा वाद कोणी केला? मी अगोदर ओबीसी बांधवांना दुखावलं असं माझं एक तरी विधान दाखवा. जातीवाद कोणी केला? मग तुम्ही आम्हाला जातीवादी कसे म्हणता? १३ तारखेच्या मतदानापर्यंत मी चांगला होतो किंवा माझा मराठा समाज चांगला होता. १३ तारीख झाली मतदान संपलं आणि गुरगुर करायला पुन्हा सुरवात केली”, असं मनोज जरांगे म्हणाले.
“एक महिनाभर शांत राहा. काहीजण म्हणाले निवडणूक झाल्यावर बघू, मतदान झाल्यावर पाहू. आपल्याला काही माणसांनी सांगितलं आपण शांत राहा. त्यांचेच लोक त्यांना पाडणार आहेत आणि मराठ्यांचं नाव घेणार आहेत. ज्या लोकांनी मराठ्यांना त्रास दिला तेथे वेळप्रसंगी उमेदवार देणार नाही. मात्र, तुम्हाला पाडल्याशिवाय मराठे मागे हटणार नाहीत. यांना सत्तेत जाऊ देणार नाही. वेळ जर आली तर आपला उमेदवार द्यायचा नाही. पण त्यांना पाडल्याशिवाय शांत बसायचं नाही”, असा इशारा मनोज जरांगे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील एका सभेत बोलताना दिला. दरम्यान, मनोज जरांगे यांच्या या विधानाचा रोख नेमकं कोणाकडे आहे, याबाबत आता चर्चा रंगल्या आहेत.