मुंबई – घर खरेदी करताना मध्यस्थ असणार्या म्हणजेच एजंटकडे महारेरा स्थावर संपदा क्षेत्रातील प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक करण्यात आले आहे. महारेराच्या या अटीशर्तीचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कठोर कारवाई व संबंधित प्रकल्प नोंदणी क्रमांक रद्द केला जाईल, असा इशारा महारेराने दिला आहे.
विकासकाने आपल्या प्रकल्पातील सदनिकांच्या विक्रीसाठी १ जानेवारीनंतर प्रशिक्षित आणि प्रमाणपत्रधारक एजंटचीच नावे आणि पत्ते प्रवर्तकांनी जाहीर करणे अपेक्षित आहे. या निर्देशांचे पालन न करणाऱ्या प्रवर्तकांच्या प्रकल्पांवर यथोचित कारवाई करण्यात येणार असून यात प्रकल्पाला नोंदणीक्रमांक नाकारण्यासारखी कारवाईही असू शकते, असे आदेश महारेराने नुकतेच जारी केले आहेत. ही कारवाई महारेरा प्रकल्प उभारणीच्या काळात केव्हाही करू शकते. १ जानेवारी २०२४ पासून हे प्रमाणपत्र असल्याशिवाय नवीन एजंट म्हणून नोंदणी किंवा नूतनीकरणही न करण्याचा निर्णय महारेराने घेतला. विकासकांनीही त्यांच्या व्यवहारांसाठी १ जानेवारीनंतर अशाच प्रशिक्षित एजंटसचीच नावे संकेतस्थळावर ठेवावी आणि त्यांची मदत घ्यावी, असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आलेले होते.