पुणे – राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कुठे उन्हाचा चटका जाणवत आहे. तर कुठे अवकाळी पाऊस कोसळत आहे. ३१ मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होणार आहे, तर १० जून दरम्यान मुंबईसह कोकणात मान्सून दाखल होण्याची शक्यता असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. तर १५ जून दरम्यान कोकणातून सह्याद्रीचा घाटमाथा ओलांडून खान्देश नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यात तसेच मराठवाडा विदर्भात मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता असल्याचे खुळे म्हणाले.
सध्या मान्सून प्रगतीपथावर आहे. आज निम्मा बंगालचा उपसागर क्षेत्र तसेच श्रीलंकेचा भुभागही दोन हिस्याने काबीज केला असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे. मान्सूनची बंगाल शाखा कदाचित लवकरही सक्रिय होवु शकते. तसे झाल्यास सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी लगतच्या जिल्ह्यात, मध्य महाराष्ट्र व खान्देशपेक्षा मान्सूनचे आगमन तेथे कदाचित अगोदरही होवु शकते. अर्थात हे सर्व जूनच्या पहिल्या आठवड्यातील मान्सूनच्या घडामोडीवर अवलंबून असेल असे माणिकराव खुळे म्हणाले. सध्याच्या उष्णतेच्या लाटा सदृश्य स्थिती पाहता, मान्सून पावसाच्या अगोदर वळीव स्वरुपातील पूर्वमोसमी, पावसाच्या सरीही कोसळू शकतात. शेतीच्या मशागतीसाठी त्यांचा उपयोग होवू शकतो असे खुळे म्हणाले.
बंगालच्या उपसागरात तयार झालेले अतितीव्र स्वरुपातील ‘ रेमल ‘ नावाचे चक्रीवादळ सोमवार २६ मे ला मध्य रात्रीला ताशी १३० ते १३५ किमी. चक्रकार वारा वेगाने बांगलादेश किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. मान्सून वाटचालीवर तसेच महाराष्ट्रात चालू असलेल्या उष्णता लाट सदृश्य स्थितीवर त्याचा कोणताही विपरीत परिणाम जाणवणार नाही असे खुळे म्हणाले. आशियाई देशांनी एकत्रित येऊन त्यांच्या प्रादेशिक भाषेत चक्रीवादळ संबंधी सुचवलेली नावे व बनवलेली यादीनुसार आता येणा-या चक्री वादळासाठी ओमान देशाने सुचवलेल्या ‘रेमल’ नाव येत आहे. म्हणून या पूर्वमोसमी हंगामातील चक्रीवादळाला ‘रेमल’ नांव दिले आहे. अरेबिक भाषेतील त्याचा अर्थ ‘ वाळू ‘ किंवा ‘ रेती ‘ होतो.
विदर्भात आणि मराठवाड्यातील १९ जिल्ह्यात दि. २६ मे पासून पुढील पाच दिवस म्हणजे गुरुवार दि. ३० मे पर्यंत अवकाळीचे वातावरण निवळून उष्णतेची लाट सदृश्य स्थिती कायम राहण्याची शक्यता जाणवते. मुंबईसह कोकण खान्देश, मध्य महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यात अवकाळीची स्थितीबरोबरच पुढील आठवडाभर म्हणजे शनिवार दि. १ जून पर्यंत उष्णतासदृश्य स्थिती कायम राहण्याची शक्यता जाणवत असल्याचे खुळे म्हणाले. कोकण वगळता महाराष्ट्रात सध्याचे दुपारचे कमाल तापमान ४० ते ४४ तर पहाटेचे किमान तापमान हे २८ ते ३० डिग्री से.ग्रेड दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
नैऋत्य मॉन्सून एक दिवसापूर्वी मुक्कामी होता, पण आता तो शुक्रवारपासून सक्रिय झाला असून आज शनिवारी बराच पुढे सरकला आहे. बंगालच्या उपसागरामधील काही भागांमध्ये त्याने प्रवेश केला आहे. पुढील वाटचाल होण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले असून २४ तासांमध्ये तो आणखी काही भागात वेळेपूर्वीच पोचेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.