वॉशिंग्टन- पृथ्वीवरील वेगवेगळ्या देशांच्या वाढत्या चांद्रमोहिमांच्या पार्श्वभूमीवर आता चंद्रासाठी एक स्वतंत्र ‘टाईम झोन’ बनवला जाणार असून ‘नासा’कडे हे वेळेचे मापक तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पृथ्वीवर विविध देशांची अक्षांश रेखांशानुसार भौगोलिक स्थाने आणि पृथ्वीला स्वत:भोवती व सूर्याभोवती भ्रमणास लागणारा वेळ यांच्यातील समीकरणानुसार पृथ्वीवरील ‘टाईम झोन’ बनवले आहेत.
काही काळापासून विविध देशांकडून चंद्रावर अधिकाधिक मोहिमा आखल्या जात आहेत. या मोहिमा अगदी मायक्रोसेकंदाच्या गणितानुसार अचूकपणे आखण्यासाठी, तसेच कार्यक्षमता वाढवण्यासाठी पृथ्वीला चंद्रावरच्या ‘युनिव्हर्सल’ वेळेची गरज भासते. म्हणूनच चंद्रासाठी स्वतंत्र ‘टाईम झोन’, अर्थात ‘कोऑर्डिनेटेड लुनार टाईम’ (एलटीसी) बनवण्याची गरज वाढली आहे.
व्हाईट हाऊस ऑफीस ऑफ सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी पॉलिसीच्या संचालक आरती प्रभाकर यांच्यानुसार वैज्ञानिक शोध, आर्थिक विकास आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी या स्वतंत्र टाईम झोनची गरज भासत आहे. पृथ्वीच्या तुलनेत चंद्राचे गुरुत्वाकर्षण कमी असल्यामुळे तेथील वेळ सुमारे ५८.७ मायक्रोसेकंदांनी वाढते. याशिवाय चंद्रावरील प्रत्येक प्रदेशात घड्याळाचा वेग वेगवेगळा असतो. पृथ्वीच्या तुलनेत चंद्रावर २९.५ दिवस जास्त असतात. या पार्श्वभूमीवर एलटीसी अनिवार्य आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी अमेरिकेने ‘नासा’ला २०२६ पर्यंतची मुदत दिली आहे.