न्यूयॉर्क – पृथ्वीपासून सुमारे २२.५३ कोटी किलोमीटर अंतरावरील म्हणजेच १४ कोटी मैल दूरवरील एका लघुग्रहावरील रहस्यमयी सिग्नल मिळवण्यात ‘नासा ‘ ला यश आले आहे.हे अंतर पृथ्वीपासून सूर्याच्या अंतराच्या दीडपट असल्याचे ‘नासा’ने म्हटले आहे.
नासाच्या या कामगिरीमुळे अवकाशातील डेटा सिग्नलरूपात मिळवून त्यावर संशोधन करणे शक्य होणार आहे.ऑक्टोबर २०२३ मध्ये नासाने सूर्यमालेत विविध धातूंपासून तयार झालेल्या ‘सायके १६’ या गुरू व मंगळ ग्रहांदरम्यान असलेल्या लघुग्रहाच्या अभ्यासासाठी अवकाश मोहीम राबवली होती. त्यासाठी पाठविलेल्या ‘सायके’ यानामध्ये अवकाशातील कोट्यवधी किलोमीटरवरील सिग्नलचा वेध घेण्यासाठी तसेच लेसर सिग्नलद्वारे माहितीचे अदानप्रदान करण्यासाठीची यंत्रणा खास ‘डीप स्पेस ऑप्टिकल कम्युनिकेशन’ प्रणालीने सुसज्ज आहे.याच प्रणालीने सुमारे २२.५३ कोटी किलोमीटरवरून महत्त्वाची माहिती रेडिओ फ्रिक्वेन्सी ट्रान्समीटरसह इंटरफेस केल्यानंतर पृथ्वीवर पाठवली. लेसर सिग्नलद्वारे आलेला जवळपास १० मिनिटांचा डेटा डानऊलिंक करण्यात यश आले आहे. त्यावर आता अभ्यास सुरू आहे. ८ एप्रिलला घेतलेल्या चाचणीत आम्ही २५ एमबीपीएसच्या वेगाने डेटा ट्रान्समिशनची चाचणी घेतल्याचेही नासाने म्हटले आहे. लेझर ट्रान्सरिसिव्हरच्या डाऊनलिंकचा वापर केल्यास हा डेटा २६७ एमबीपीएसच्या वेगाने प्रसारित करता येणे शक्य आहे.