ठाणे – महायुतीने ठाणे लोकसभा मतारसंघातून नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर केली आहे. नरेश म्हस्के यांच्या उमेदवारी बाबत ठाण्यातील मनसे नेते अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नरेश म्हस्के मनसेच्या मतांच्या जीवावर निवडून येतील, असा दावा अविनाश जाधव यांनी केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या सूचनांनुसार मनसे पदाधिकारी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. ठाण्यात देखील मनसेचे पदाधिकारी महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा प्रचार करणार आहेत. मात्र अशातच अविनाश जाधव यांनी नरेश म्हस्के यांच्या विजयाबाबत दावा केला आहे.
अविनाश जाधव यांनी सांगितले की, सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. आमचा आनंद तुम्हाला निवडणुकीत दिसेल. महायुतीचे सरकार यावे, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. नरेश म्हस्के यांचा विजय खूप सोपा आहे. राजन विचारे यांचा १० वर्षांचा कार्यकाळ पाहिला, तर शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता २ वर्षात ते दिसत आहेत. त्याआधी ८ वर्ष दिसत नव्हते. ८ वर्षे आम्हाला खासदार शोधावे लागत होते. त्यामुळे ठाण्यातील लढाई कठीण आहे असे आम्हाला वाटत नाही. मनसेचे ठाण्यात २ लाख मत आहे. मनसेच्या मतांच्या जीवावर नरेश म्हस्के निवडून येतील. ठाण्यात नरेश म्हस्के यांचा विजय पक्का आहे. राजन विचारे यांचा प्रचार जरी आधीच सुरु झाला असला, तरी विजय म्हस्केंचा होईल. ठाणे जिल्ह्यातील सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार निवडणून येतील.