रत्नागिरी – लांजा तालुक्यात २९ महिला समर्थपणे पोलीस पाटील पद घेऊन गावात कायदा सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हानात्मक काम लीलया करत आहेत. या नारीशक्तीचे विशेष कौतुक होत आहे. तालुक्यात १२३ गावांत पोलीस पाटलांची ९८ पदे भरण्यात आली असून २४ पदे रिक्त आहेत. नुकतीच पोलीस पाटील या पदासाठी भरती आरक्षण आणि लेखी परीक्षा, शैक्षणिक पात्रता मुलाखतीद्वारे करण्यात आली. महिला आरक्षण असल्याने अनेक पदवीधर, बारावी, उच्चशिक्षित महिला उमेदवारांना गावाच्या कारभारात मानाचे पोलीस पाटील पद मिळाले आहे. या महिलांना गावाच्या निर्णय प्रक्रियेत महत्त्वाचे स्थान मिळाले आहे.
महिलांना असलेले ३३ टक्के आरक्षण पोलीस पाटील पदासाठीही आहे. बॉम्बे सिव्हिल कायदा १८५७ नुसार पोलीस पाटील पद निर्मिती झाली. महाराष्ट्र मुलकी पोलीस अधिनियम १९६२ नुसार १ जानेवारी १९६२ पासून वंशपरंपरागत मुलकी पोलीस पाटील की रद्द करण्यात आली. आता आरक्षण आणि शैक्षणिक पात्रतेनुसार या पदाला महत्त्व प्राप्त झाले आहे. लांजा तालुक्यातील २९ महिला आज अतिशय समर्थपणे हे पोलीस पाटीलपद सांभाळत आहेत.
लांजा तालुक्यात शिरंबवली सौ. दर्शना सावंत, शिपोशी तेजस्विनी धावडे, कुवे शैलजा गुरव, वाघणगाव आश्विनी माईन, खानवली स्नेहा शिंदे, आंजणारी सौ. श्रद्धा सरपोतदार, पुनस वैदेही यादव, आसगे स्वरूप दाभोलकर, जावडे श्वेता बेर्डे, विलवडे सौ. दीपाली खामकर, बोरिवले जानवी कालकर, गोविळ वैदेही गुरव, कोंडगे खोरगाव वनिता सावंत, उपळे विरगाव विधी वीर, वेरवली साक्षी जाधव, कोंड्ये रांबडेगाव सौ. श्वेता पन्हाळकर, निओशी वैदेही गुरव, बनखोर सौ. मयूरी ब्रीद, कुरणे सुप्रिया घडशी, शिपोशी बाईंगगाव अवनी बाने, पुनस रुंजी कांबळे, वेरळ सना मुल्ला, खेरवसे रूपाली कांबळे, लांजा गोंडेसखल साक्षी गुरव, वेहेळ स्पृहा जाधव, मठ कडूगाव सुप्रिया सुर्वे, आडवली रोशनी आगरे या २९ महिला पोलीस पाटीलपद सांभाळत आहेत.
लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून निवड करण्यात आली. यामुळे अनेक अनुसूचित जातीच्या महिलांना प्राधान्य मिळाले. साधारण २५ ते ४० वर्षें वयोगटातल्या महिलांचा त्यात समावेश आहे. ग्रामीण भागात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना आता आळा बसण्यास निश्चित मदत होणार आहे.
शब्दांकन -मंगेश तरोळे – पाटील