मुंबई – एकीकडे पावसाची दमदार सुरुवात झाल्याने बळीराजा सुखावला असून पेरणीच्या कामाची तयारी करत आहे. पेरणीनंतर वारकरी, शेतकरी विठुरायाच्या जपनामात मग्न होणार आहेत. दुसरीकडे पंढरीच्या वारीची तयारीही प्रशासनाने सुरू केली आहे. आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत श्री श्रेत्र पंढरपूरला जाणा-या भाविक प्रवाशांसाठी एसटीने यात्राकाळात ५ हजार विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे. ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास बस थेट गावात उपलब्ध होणार आहे. त्यासाठी जवळच्या आगारात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आषाढी वारीसाठी राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने पंढरीला जात असतात. भाविक भक्तांची मागणी लक्षात घेऊन त्यांना पंढरीला जाण्यासाठी थेट गावातून सोय उपलब्ध करून देण्याची भूमिका एसटी महामंडळाने घेतली आहे. त्यासाठी राज्यातील कोणत्याही गावातून किमान ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी तशी एकत्रित मागणी केल्यास थेट गावातून पंढरीला जाण्यासाठी बसची सोय होणार आहे. त्यामुळे भाविकांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. पावसाळ््यात भाविकांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. याचा विचार करून एसटीची सोय उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
सालाबाद प्रमाणे श्री श्रेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक-प्रवाशी येतात. अनेक प्रवाशी स्वत:च्या खाजगी वाहनाने, रेल्वेने, एसटीने अथवा विविध पालखीं बरोबर चालत दिंडीने येतात, या प्रवाशांना एसटीने यंदापासून थेट गाव ते पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. ४० पेक्षा जास्त भाविक प्रवाशांची संख्या असल्यास त्यांना त्यांच्या गावापासून विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. अर्थात या प्रवासात देखील ७५ वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी ५० टक्के तिकीट दरात सुट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत. दरम्यान, मागील वर्षी एसटीने आषाढी यात्रेनिमित्त ४२४५ विशेष बसेस सोडल्या होत्या. याव्दारे यात्रा काळात १८ लाख, ३० हजार ९३४ भाविक प्रवाशांची सुखरूप ने-आण एसटीने केली होती.